सातारा – सातारा शहरातील बहुचर्चित ग्रेड सेपरेटरचे अनौपचारिक उद्घाटन खा. उदयनराजे भोसले यांनी पालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांच्या उपस्थितीत केल्यानंतर त्याचे शासनाकडून अधिकृत उद्घाटन लवकरच होणार आहे. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची तारीख घेऊन हे उद्घाटन केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी गुरुवारी दिली.
कोविड लसीकरणाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी सिंह यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ग्रेड सेपरेटरमधील त्रुटींबाबत प्रसामाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. ग्रेड सेपरेटरचे अधिकृत उद्घाटन लवकरच केले जाईल. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा करुन तारीख ठरवली जाईल, असे सिंह यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित ठाकरे यांना आमंत्रित केले जाण्याची चर्चा आहे. त्याबद्दल विचारले असता, आय कान्ट कमेंट, असे सिंह म्हणाले. ग्रेड सेपरेटरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे व अन्य सुविधा देण्याची ग्वाही शेखर सिंह यांनी दिली.
दरम्यान, खा. उदयनराजे यांनी 8 जानेवारीला ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करून तो वाहनांसाठी खुला केला होता. कामाच्या पाहणीचे निमित्त करून त्यांनी थेट उद्घाटनच उरकले, तेव्हा शासकीय कार्यालयांना त्याबाबत कल्पना नव्हती. आता याच ग्रेड सेपरेटरचे शासनाकडून अधिकृत उद्घाटन होणार असल्याने याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.