मुंबई- सध्या चित्रपटसृष्टीत ‘साहो’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर अभिनेता प्रभास आता ‘साहो’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, नुकताच ‘साहो’चा ऍक्शन पॅक ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, काही तासातच चित्रपटाच्या ट्रेलरला जोरदार लाईक मिळायला लागले आहेत.
ऍक्शन लव्हर्स प्रेक्षकांना साहो चित्रपट नक्की आवडेल, असा मालमसाला यामध्ये ठासून भरलेला आहे. सध्या चित्रपटाच्या दमदार ट्रेलर मुळे फॅन्स देखील भलतेच एक्साईट झाले आहेत.
‘साहो’मध्ये अभिनेता प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये (30 ऑगस्टला) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरुण विजय आणि मुरली शर्मा, अशी तगडी स्टारकास्ट भरली आहे.