मुंबई – क्रिकेटच्या सर्व स्वरूपांच्या सामन्यांमध्ये विराट कोहलीसारखे सातत्य अन्य कोणत्याच खेळाडूकडे नाही. मात्र सध्याच्या काळातील महान खेळाडूंचा विचार करायचा झाला तर मी त्याला केन विल्यमसन व स्टीव्ह स्मिथ यांच्यानंतर स्थान देईन असे इंग्लंडचे माजी कर्णधार माईक गॅटिंग यांनी सांगितले.
गॅटिंग हे येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानिमित्ताने पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मर्यादित षटकांच्या सामन्यांबरोबरच कसोटी सामन्यांमध्ये जो जास्त सातत्याने चमक दाखवितो माझ्या दृष्टीने महान खेळाडू आहे. कोहलीकडे आकर्षक फटकेबाजीची शैली आहे. मी देखील त्याच्या झंझावती खेळाचा चाहता आहे. स्मिथने इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीमधील दोन्ही डावांमध्ये केलेली शतके ही अतुलनीयच होती. त्यामुळेच त्याच्या संघास विजय साध्य करता आला. त्याला झटपट कसे बाद करता येईल याचा विचार आमच्या गोलंदाजांनी केला पाहिजे. स्मिथ जर लवकर बाद झाला तर त्याच्या संघाचे काय हाल होतात हे पाहण्याची मला उत्सुक्तता आहे. अर्थात सामन्यास कोणत्याही क्षणी कलाटणी देण्याची क्षमता ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यांच्याविरूद्ध मालिका जिंकण्यासाठी आम्हाला मोठा गडच सर करावा लागणार आहे.
गॅटिंग उवाच….
-महान खेळाडूंमधे कोहलीस तिसरे स्थान
-कसोटीत जर्सीवर नाव व क्रमांक घालण्याच्या संकल्पनेस माझा विरोध नाही
-विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंचांकडून चुका झाल्या
-न्यूझीलंड संघही विश्वविजेतेपदाच्याच लायकीचा
-टी-10 च्या सामन्यांना माझा विरोधच
इरापल्ली प्रसन्ना, बी.चंद्रशेखर व बिशनसिंग बेदी यांच्यासारख्या श्रेष्ठ फिरकी गोलंदाजांसमोर फलंदाजी करण्याचे भाग्य मला लाभले. प्रतिस्पर्धी फलंदाजांवर हुकमत गाजविण्याची शैली त्यांच्याकडे होती. एस.वेंकटराघवन यांच्याकडेही तशी क्षमता होती. स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पंच म्हणूनही खूप चांगले काम केले आहे, असेही गॅटिंग यांनी सांगितले.