पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील जलतरण तलावावरील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेकडून ऑनलाइन तिकीट विक्री सुरू केली खरी, मात्र त्यासाठी जलतरणपट्टंना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. अनेक वेळेला तिकीट विक्री बंद पडत आहे. आकस्मिक, तांत्रिक कारणांनी किंवा सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी तलाव बंद ठेवावा लागल्यास पासमधून तेवढ्या दिवसांच्या रकमेची कपात केली जात नाही किंवा त्यांना तितक्या दिवसांची मुदतवाढ दिली जात नसल्याचे दिसून येत आहे.
करोना काळात शहरातील सर्व जलतरण तलाव बंद ठेवण्यात आले होते. करोनानंतर काही तलाव सुरू झाले आहेत तर काही तलाव अद्यापही प्रतिक्षेत आहेत. शहरात महापालिकेचे सुमारे १३ जलतरण तलाव आहेत. या सर्व तलावांसाठी महापालिकेकडून सध्या ऑनलाइन तिकीट विक्री सुरू केली आहे.
मात्र जलतरण तलावांच्या दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यात आजही समस्यांचा अडथळा येत आहे. अनेक वेळेला तां.ित्रक अडचणींमुळे तिकिट विक्री बंद पडत आहे. त्यामुळे नागरिकांना पोहता येत नाही. या कारभाराविरोधात नागरिक नापसंती व्यक्त करत आहेत.
या पूर्वी नागरिकांना मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक पास दिले जात होते. त्यांचे दरही कमी होते. मात्र, काही महिन्यांपासून पोहण्याच्या दैनंदिन तिकिटाचे दर पूर्वीपेक्षा दुप्पट; तर तिमाही पासचे दर चौपट आकारले जात आहेत. तसेच मासिक, सहामाही आणि वार्षिक पास उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत.
यासह नागरिक अनेक तक्रारींचे गाऱ्हाणे मांडत आहेत. यामध्ये तिकिटाचे अधिकचे दर, ऑनलाइन तिकीट विक्री बंद पडणे, मासिक, सहामही, वार्षिक पासची सोय नाही. यावर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
सार्वजनिक सुट्या किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे तलाव बंद ठेवावा लागल्यास दैनंदिन वगळता इतर पासधारकांना त्यांचे पैसे परत देण्याची तरतूद नाही. आयुक्तांच्या परवानगीने तितक्या दिवसांची मुदतवाढ पासधारकांना देण्यासाठी प्रयत्न करता येइल असे आश्वासन संबंधीत अधिकाऱ्यांनी दिले. मात्र अद्याप त्याला मुहूर्त मिळत नाही.