“जनहित में जारी’ या आपल्या आगामी सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नुसरत भरुचा जखमी झाली आहे. तिच्या घोट्याला दुखापत झाली आहे, असे समजते आहे. मध्य प्रदेशातील मंदेरी इथे हे शूटिंग सुरू होते.
नुसरतने इन्स्टाग्रामवर आपल्या सुजलेल्या पायाचा फोटो पोस्ट केला आहे. बुसान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अलीकडेच नुसरत भरुचाला “बेस्ट ऍक्ट्रेस’ म्हणून नामांकन मिळाले होते. नेटफ्लिक्सवरील “अजीब दास्तान’साठी तिला हे नामांकन मिळाले होते.
“जनहित में जारी’मधील होळीच्या एका गाण्यात नाचताना तिचा पाय मुरगळला. हे शूटिंग एका हमरस्त्यावर सुरू होते. रस्त्यावर खडी आणि दगडगोटेही होते. होळीचे रंगही उधळले गेले होते. नुसरत अनवाणीच नाचत होती. रस्त्यावरील दगडांवरून तिचा पाय घसरला आणि मुरगळला. सेटवर डॉक्टरांना बोलावले गेले.
मात्र, तोपर्यंत थांबण्यापेक्षा नुसरतने आपले शूटिंग सुरूच ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र, वेदनांमुळे तिला तेवढेही नाचता येईना. अखेर एक्स रे काढल्यावर नुसरतला 3 दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला. “जनहित में जारी’मध्ये नुसरतबरोबर अन्नू कपूर, अनुद सिंग धाका आणि परितोष त्रिपाठी हे सहकलाकार असणार आहेत.