कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील तीस वर्षीय युवक करोना पॉझिटिव्ह आला आहे. शाहूवाडी तालुक्यातील हा पहिला रूग्ण असून जिल्ह्यात पाचवा करोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे. यामुळे आता जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली आहे. जिल्हा वैद्यकीय पथक येथील परिसरात रवाना झाले असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींचा शोध सुरु आहे.
मलकापूरपासून पावनखिंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक किलोमीटर अंतरावर उचलत या गावात हा पॉझिटिव्ह रूग्ण सापडला आहे. मलकापूरपासून पांढरेपाणीकडे जाणाऱ्या मार्गावर उचत हे गाव आहे. संबंधित तरुण हा तबलिगच्या कार्यक्रमास दिल्लीस गेला होता.
दिल्लीतील मरकजहून जिल्ह्यात परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील 30 वर्षीय तरुण करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली.
हा तरुण दिल्लीहून 16 मार्चला कोल्हापुरात पोहोचला होता. त्यानंतर धार्मिक स्थळामध्ये एक दिवस राहून तो मलकापूरला खासगी वाहनातून गेला. मलकापूरमधील धार्मिक स्थळातही तो एक दिवस राहिला. यानंतर तो आपल्या घरी दि. 18 मार्चला परतला.
पन्हाळा येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात 1 एप्रिलला प्रशासनामार्फत दाखल करण्यात आले होते. मरकजहून परतलेल्या अन्य प्रवाशांसोबतच त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला सीपीआरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याला कोल्हापुरातून मलकापूरला घेवून जाणाऱ्या त्याच्या संपर्कातील अन्य चौघांची तपासणीही करण्यात येत आहे.