मुंबई – करोनामुळे तसेच लॉकडाऊनमुळे सध्या क्रिकेटचे कोणतेही सामने नसल्याने चाहत्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकार व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जुन्या पण गाजलेल्या सामन्यांचे पुनर्प्रक्षेपण करण्याचे जाहीर केले आहे. डीडी क्रीडा वाहिनीवरून या सामन्यांचा आनंद क्रिकेट चाहत्यांना घेता येणार आहे.
सध्या देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी सातत्याने आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरीही करोनाबाबत नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे किमान काही टक्के लोकांना तरी घरातच थांबविण्यासाठी करण्यात येत असलेला हा एक प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.
खरेतर या काळात गेली 12 वर्षे इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) खेळविण्यात येते. यावेळी 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.