नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान आणि चीनकडून भारताचा काही भाग हा त्यांच्या देशाचा असल्याचे दाखवत वारंवार खोडसाळपणा करण्यात येत असतो. त्याला भारताकडून सडेतोड प्रत्त्युत्तर देखील देण्यात येते. असाच काहीसा खोडसाळपणा आता चक्क WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आला आहे. WHO ने जम्मू-काश्मीर पाकचा तर अरुणाचल चीनचा भाग दाखवण्यात आले आहे. यावरून देशात आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांनी याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रविवारी एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये जागतिक आरोग्य संघटनेसंदर्भात सेन यांनी एक तक्रार मोदींकडे केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या कोव्हिड-१९ डॅशबोर्डमध्ये जम्मू काश्मीर हा पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग असल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप सेन यांनी केला आहे.
.#WHO COVID https://t.co/HSTaKkj0Yc site shows map of #India with a separate colour for Jammu & Kashmir&inside that there is another small portion of a separate colour.
If they are clicked,#Covid datas of #Pakistan & #China are coming.@narendramodi must take up.@MamataOfficial pic.twitter.com/prSoZ2IsJg— DR SANTANU SEN (@SantanuSenMP) January 30, 2022
सेन यांनी पत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार, ते स्वत: जागतिक आरोग्य संघटनेचा हा डॅशबोर्ड पाहताना ही गोष्ट लक्षात आल्याचे म्हटले आहे. “मी जेव्हा या साईटवरील निळ्या भागावर क्लिक केलं तेव्हा आपल्या देशातील कोव्हिड-१९ बद्दलची माहिती दाखवण्यात आली होती. मात्र मला धक्का बसला जेव्हा मी वेगळ्या रंगाच्या भागावर क्लिक केलं. या ठिकाणी आपल्या जम्मू काश्मीर राज्यावर क्लिक केलं तेव्हा पाकिस्तानची माहिती दाखवण्यात आलेली. असेच चीनसंदर्भातील माहितीबद्दलही या साईटवर दिसून आलं,” असा उल्लेख सेन यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात केला आहे.
ही अंतरराष्ट्रीय स्तरावरील एक गंभीर बाब असून याची सरकारने दखल घेऊन ती सुधारली पाहिजे, असं सेन म्हणालेत. ‘हे आपल्या देशातील नागरिकांसाठी फार खेदजनक आहे,’ असेही सेन म्हणाले.
या प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदींनी चौकशीचे आदेश द्यावेत आणि या मोठ्या चुकी संदर्भात कारवाई करावी, अशी मागणीही सेन यांनी पत्रात केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच आरोग्य खात्यालाही सेन यांनी या पत्राची एक एक प्रत पाठवली आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.