इस्लामाबाद – राजकीय अस्थिरतेमधून बाहेर पडत असतानाच आता पाकिस्तानसमोर आर्थिक अस्थैर्याचे संकट उभे राहिले आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानला आता पुढच्या महिन्यात डिझेल टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे, असा इशारा तज्ञांनी पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांना दिला आहे. पाकिस्तानमध्ये डिझेलचा साठा केवळ 18 दिवस पुरेल इतकाच शिल्लक राहिला आहे, असे एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
या वर्षी एप्रिलच्या केवळ एका महिन्यात सुमारे 60 अब्ज पाकिस्तानी रुपये जमा झाल्याने किमतीतील तफावत टाळण्यासाठी तज्ज्ञांनी शाहबाझ शरीफ यांना तेलाच्या किमती वाढवण्याची विनंती केली होती. जर तेलाच्या किंमती वाढवण्यात आल्या तर देशात आंदोलन होणार नाही, असेही शाहबाझ शरीफ यांना सांगण्यात आले होते.
मात्र शरीफ यांनी ही विनंती मान्य केली. पाकिस्तानात इंधनाची टंचाई असतानाही त्यांनी इंधनाचे दर वाढवण्यास नकार दिला.
पाकिस्तान स्टेट ऑईल या सरकारी कंपनीने यापूर्वी निविदा काढून डिझेल आयात करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या निविदांना कोणाही व्यापारी कंपनीने प्रतिसाद दिला नाही. जागतिक बाजारपेठेतच डिझेल उपलब्ध नसल्यामुळे 13 डॉलर इतक्या वाढीव किंमतीला एक डिझेल कार्गो उपलब्ध केला गेला होता. पाकिस्तान सरकारने स्थानिक तेलविहीरींना तेलाचे उत्पादन वाढवण्याची सूचना केली आहे. मात्र स्थानिक तेलविहरीही दरातील तफावतींच्या दाव्यांमुळे आर्थिक अडचणीत आल्या आहेत.