अंकारा,(तुर्की) – तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोगन यांनी तुर्की नागरिकांना आंतरराष्ट्रीय सहकार्याने अंतराळात पाठवण्याचे तुर्कीचे उद्दीष्ट जाहीर केले आहे. तुर्कीच्या 10 वर्षांच्या अंतराळ कार्यक्रमांची घोषणा त्यांनी केली. त्यामध्ये चंद्रावरील मोहिम, तुर्की अंतराळवीरांना अवकाशात पाठविणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरावरील सहकार्यातून उपग्रह प्रणाली विकसित करण्यांचा समावेश आहे. तुर्कीला विस्तारित क्षेत्रीय आणि जागतिक पातळीवर आघाडीवर नेऊन ठेवण्याच्या दृष्टीकोनातून एर्दोगान यांनी हा कार्यक्रम जाहीर केला.
तुर्की प्रजासत्ताकाच्या स्थापनेचे शताब्दीचे वर्ष असलेल्या 2023 मध्ये चंद्राशी पहिला संपर्क करण्याची योजना तुर्कीने आखली आहे. या मिशनचा पहिला टप्पा आंतरराष्ट्रीय सहकार्याने होईल. तर दुसऱ्या टप्प्यात तुर्कीच्या स्वतःच्या रॉकेटचा उपयोग होईल, असे एर्डोगन यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय सहकार्याने तुर्की नागरिकांना अंतराळात पाठविणे, आंतराळ स्थानक बनवण्यासाठी इतर देशांबरोबर काम करणे आणि उपग्रह तंत्रज्ञानामध्ये ग्लोबल ब्रॅंड तयार करणे हेदेखील तुर्कीचे उद्दिष्ट असल्याचे एर्दोगन यांनी जाहीर केले.
तुर्कीने 2018 मध्ये काही निवडक इतर देशांच्या अंतराळ कार्यक्रमासह सामील होण्याच्या उद्देशाने तुर्की अंतराळ संस्था किंवा ‘टीयूए’ ची स्थापना केली. मात्र देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असताना अशा उद्दीष्टांवर प्रचंड पैसा खर्च करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीकाकारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तुर्की आपले उद्दिष्ट कसे साध्य करेल, याची माहिती एर्दोगन यांनी दिली नाही. गेल्या महिन्यात, त्यांनी आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी दूरध्वनीद्वारे तुर्की कंपन्यांसह अवकाश तंत्रज्ञानावरील सहकार्याबद्दल चर्चा केली आहे.