नवी दिल्ली -सार्वजनिक इंधन कंपन्यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली. ती इंधने लिटरमागे अनुक्रमे 30 आणि 25 पैशांनी महागली. इंधन दरवाढीचे सत्र कायम असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नवनवा उच्चांक गाठत आहेत.
आता पेट्रोलचा दर दिल्लीत 87 रूपये 60 पैसे, तर मुंबईत 94 रूपये 12 पैसे इतका झाला आहे. दिल्लीत डिझेलचा दर 77 रूपये 73 पैसे, तर मुंबईत 84 रूपये 63 पैसे इतका आहे. नववर्षात आतापर्यंत लिटरमागे पेट्रोल 3 रूपये 89 पैशांनी, तर डिझेल 3 रूपये 86 पैशांनी महागले आहे. इंधन दरवाढीच्या सत्रामुळे महागाईचा आगडोंब उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.