पिंपरी (प्रतिनिधी): “लॉकडाऊन’चा तिसरा टप्पा जाहीर केल्यानंतर काही गोष्टींमध्ये शिथिलता आणण्यात आली. या शिथिलतेचा नागरिकांना प्रचंड गैरफायदा घेतल्याने “करोना’च्या समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. सोमवारी एकाच दिवशी गावी जाऊ इच्छिणाऱ्या मजूरांसह हजारो तळीराम रस्त्यांवर उरतल्यामुळे लॉकडाऊन संपुष्टात आल्यासारखेच चित्र शहरात पहावयास मिळाले.
अनेकजणांनी स्वत:चे वाहने काढून बाजारपेठेसह शहराचा फेरफटका मारल्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या वाढण्याची भिती सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे. सलग दुसऱ्या दिवशीही एकीकडे मद्यप्रेमींनी दिवसभर दारुच्या दुकानांबाहेर रांगा लावल्या तर गावी जाऊ इच्छिणाऱ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दवाखान्यांजवळ सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत गर्दी केली.
पहिल्या दोन लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली मात्र तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये काही नियम शिथील करताना दारुच्या दुकानांसह काही अस्थापना उघडण्यास परवानगी देण्यात आली तर परप्रांतीय मजूरांना त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या 43 दिवसांपासून घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली. सोमवारी लॉकडाऊनमधून काही अंशी दिलासा मिळताच हजारोंच्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले. पोलीस स्टेशनसमोर अर्ज भरण्यासाठी तर दवाखान्यांसमोर वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी गर्दी झाली. त्याशिवाय दारुच्या दुकानांसमोर तळीरामांनी मोठी गर्दी केली. या गर्दीने लॉकडाऊनचे सर्व नियम पायदळी तुडवितानाच सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडविल्याचे चित्र सर्वच ठिकाणी पहावयास मिळाले. पिंपरी-चिंचवड शहर हे रेडझोनमध्ये असून दिवसेंदिवस करोना बाधितांचा आकडा वाढत आहे.
शहरातील 21 परिसर हे कंटेन्मेंट म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. पालिका प्रशासन तथा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 3 मे रोजीच करोनाच्या “कम्युनिटी ट्रान्सफर’चा धोका वर्तविला होता. अवघ्या दोनच दिवसांनी शहरातील चित्र अत्यंत दुर्देवी आणि तितकेच धोकायदायक पहावयास मिळाले. मंगळवारीही अशीच परिस्थिती पहावयास मिळाली. या गर्दीपुढे पालिका आणि पोलीस प्रशासन हतबल झाल्याचे चित्रही अनेक परिसरात पहावयास मिळाले. रस्त्यावर वाढलेली गर्दी, प्रशासनाच्या सूचनांकडे होत असलेले दुर्लक्ष, शिथिलतेचा घेतला जात असलेला गैरफायदा हा करोनाच्या संसर्गाला आमंत्रण देण्याचाच प्रकार असल्याचे दिसून येत आहे.
प्रशासनासमोर आवाहन
शहरातील अनेक दारु दुकाने, बाजार, मंडई, रस्ते, पोलीस स्टेशन आणि दवाखान्यांपुढे होत असलेल्या बेभान गर्दीमुळे करोनाचा मोठ्या प्रमाणात धोका वाढला आहे. एका बाजूला लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करणारे नागरीक तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय सूचनांचा पायदळी तुडविणारे परप्रांतीय आणि तळीराम असे चित्र दिसून येत आहे. ही गर्दी आटोक्यात ठेवण्याबरोबरच समूह संसर्गाचा धोका रोखण्याचे आवाहन प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
टवाळखोरांची गर्दी
लॉकडाऊनमध्ये शिथिलता निर्माण झाल्याचे दिसून येताच टवाळखोरांची गर्दीही रस्त्यावर वाढू लागली आहे. स्वत:ची दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन रस्त्यावर फिरणारे सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसांत अचानक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. रस्त्यावरून फिरणे, दारुच्या दुकानापुढील गर्दीचे छायाचित्र, व्हिडीओ काढणे असा प्रकार या टवाळखोरांकडून मंगळवारी दिवसभर सुरू होता.