वाघोली : दारू दुकाने सुरु ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशातील अटी व शर्थींचे पालन न करता गर्दी जमवून दारू विकल्याप्रकरणी वाघोली-आव्हाळवाडी रोडच्या सागर वाईन्स या दारूच्या दुकानावर कारवाई करून मालक व मॅनेजरवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर वाईन्सचे मालक सागर निरंजन बत्रा (रा. कल्याणीनगर) व मॅनेजर मनोजकुमार देविदास नागदेव (रा. वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक वैजनाथ नागरगोजे यांनी फिर्याद दिली आहे.
शासन व पुणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये दारूची दुकाने उघडण्यासाठी अटी व शर्थीसह परवानगी सोमवारी ४ मे रोजी देण्यात आली. यामध्ये दुकानासमोर सोशल डीस्टन्सिंगचे पालन करावे, कामगारांची, ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावी, दुकानासमोर एकावेळी पाचपेक्षा जास्त ग्राहक असता कामा नये, सभोवतालचा परिसर निर्जंतुकीकरण करावा, आदी सूचनांचे फलक लावण्यात यावेत असे नमूद करण्यात आले आहे. आदेश प्राप्त होताच वाघोली परिसरातील दारूची दुकाने दुपारी उघडली होती.
वाघोली येथील दारू दुकाने उघडली असल्याची माहिती समजताच सागर वाईन्स या दुकानासमोर तळीरामांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा फज्जा उडवत सागर वाईन्स दुकानातून ग्राहकांना सर्रास दारू विक्री केली जात होती. यानंतर पोलिसांनी दारूची दुकाने बंद करून सागर वाईन्सच्या मालकावर व मॅनेजरवर कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचा आजार प्रतिबंध अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.