सूरजकुंड (हरियाणा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पोलिसांसाठी “एक राष्ट्र, एक गणवेश” ही नवीन संकल्पना मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की आपण केवळ ही संकल्पना मांडत आहोत. ती राज्यांवर लादण्याचा आपला प्रयत्न नाही. विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या एका शिबीराला संबोधित करताना त्यांनी ही सुचना मांडली.
देशातील गुन्हेगारी आणि त्यांचा बिमोड करण्यासाठी विविध राज्यांच्या गृह विभागांमध्ये अधिक समन्वय असला पाहिजे अशी अपेक्षाहीं त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले, सहकारी संघराज्य ही केवळ संविधानाची भावना नसून राज्ये आणि केंद्राचीही ती जबाबदारी आहे.
मोदी म्हणाले की, पोलिसांसाठी एक राष्ट्र, एक गणवेश ही फक्त एक कल्पना आहे. मी ती तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत नाही. जरा विचार करा. हे 5, 50 किंवा 100 वर्षात घडू शकते. जरा विचार करा. पंतप्रधान म्हणाले की देशभरातील पोलिसांची ओळख एकसारखी असावी असे मला वाटते.
कायदा आणि सुव्यवस्था तसेच सुरक्षेच्या संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांनी राज्य सरकारांना जुन्या कायद्यांचे पुनरावलोकन करण्याचे आणि सद्य परिस्थितीनुसार त्यामध्ये सुधारणा करण्याचे आवाहन केले.
मोदी म्हणाले की, पोलिसांबद्दल समाजात चांगली प्रतिमा निर्माण होणे अत्यंत महत्वाचे आहे आणि या संबंधात होणाऱ्या चुका आपण दुरूस्त केल्या पाहिजेत. पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी अधिक कार्यक्षम राहून सर्वसामान्यांना संरक्षण मिळावे यासाठी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.