ट्रम्प केवळ जमीन परत करण्यास इम्रान यांना सांगू शकतात
नवी दिल्ली – मोदी सरकारने 370 वे कलम रद्द केल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीर (पीओके) परत मिळवण्याचा पुढील अजेंडा निश्चित करावा, असे आवाहन राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम् स्वामी यांनी केले आहे.
जम्मू-काश्मीरबाबतचा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निर्धारपूर्वक पाऊल उचलले. पीओकेबाबतही ते तसेच पाऊल उचलतील असा विश्वास वाटतो. केंद्रात नरसिंह राव सरकार असताना पीओके परत मिळवण्यासाठी संसदेने एकमताने ठराव मंजूर केला होता, अशी आठवणही स्वामी यांनी करून दिली.
कलम 370 अस्तित्वात असताना इतर घटक त्याचा गैरफायदा घेत होते. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अलिकडेच झालेल्या भेटीवरून ते स्पष्ट होते. काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा ट्रम्प यांनी चुकून व्यक्त केली. आता संबंधित कलम गेल्याने मध्यस्थीसाठी काहीच उरलेले नाही. भारताकडून अवैधपणे घेतलेली जमीन परत करा एवढेच ट्रम्प आता इम्रान यांना सांगू शकतात, अशी पुस्तीही स्वामी यांनी जोडली.