बर्मिंगहॅम – ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळेच ऍशेस क्रिकेट मालिकेतील पहिल्याच सामन्यात इंग्लंडला पराभवास सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने 251 धावांनी विजय मिळवित पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. फिरकी गोलंदाज नॅथन लायन याने सहा विकेट्स घेत त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. पॅट कमिन्सने 4 गडी बाद करीत त्याला चांगली साथ दिली.
विजयासाठी 398 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 52.3 षटकांत 146 धावांमध्ये कोसळला. इंग्लंडने बिनबाद 13 धावांवर दुसरा डाव पुढे सुरू केला. पहिल्या डावातील शतकवीर रोरी बर्न्स याची विकेट त्यांनी लगेचच गमावली. पॅट कमिन्सच्या षटकांत नॅथन लायनने त्याचा झेल घेतला. जेसन रॉय व कर्णधार जो रूट यांनी 41 धावांची भागीदारी केली. ही जोडी मोठी खेळी करणार असे वाटले होते. तथापि लायनने रॉयचा 28 धावांवर त्रिफळा उडवित त्यांच्या डावास खिंडार पाडले. त्याने पाठोपाठ जो डेन्ली (11) व रूट (28) यांना बाद करीत इंग्लंडची दयनीय स्थिती केली.
लायन एवढ्यावरच थांबला नाही. त्याने भरवशाचा फलंदाज बेन स्टोक्सला बाद केले. स्टोक्सल केवळ 6 धावाच करता आल्या. त्याआधी कमिन्सने जॉनी बेअरस्टो याला बाद करीत संघाच्या विजयाच्या मार्गातील आणखी एक अडसर दूर केला होता. स्टोक्स बाद झाला त्यावेळी इंग्लंडची 7 बाद 97 अशी अवस्था होती.
ख्रिस व्होक्सने आक्रमक सुरूवात केली. त्याने पाच चौकार मारले. चहापानापूर्वी इंग्लंडने मोईन अलीचीही विकेट गमावली. त्याला बाद करीत लायनने एकाच डावात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम केला. पाठोपाठ त्याने स्टुअर्ट ब्रॉडला शून्यावरच बाद करीत त्यांची 9 बाद 136 अशी स्थिती केली. जेम्स अँडरसनने त्याला हॅट्ट्रिकच्या मानापासून वंचित केले. एका बाजूने झुंजार खेळ करणाऱ्या ख्रिस व्होक्सने 7 चौकारांसह 37 धावा केल्या. कमिन्सने त्याला बाद करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया 284 व 7 बाद 487 (घोषित) इंग्लंड 374 व 52.3 षटकांत सर्वबाद 146 (ख्रिस व्होक्स 37, जेसन रॉय 28,जो रूट 28, नॅथन लायन 6-49, पॅट कमिन्स 4-32)