परळी – परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादीने युती केल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी एकत्र येत वैद्यनाथ कारखान्यात बिनविरोध निवडणुक पार पाडली आहे.
त्यानंतर वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे यांची तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडेचे विश्वासू चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता परळीत मुंडे बंधूभगिनींच्या नव्या राजकीय समीकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणावरही उमटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 10 आणि भाजपाचे 11 उमेदवार विजयी झाले होते. दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत न मिळाल्याने धनंजय आणि पंकजा यांच्यात सत्तेसाठी वर्चस्वाची लढाई सुरू झाली होती.
त्यानंतर आता दोन्ही नेत्यांनी युती करत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठे राजकीय महत्त्व आले आहे.
परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. त्यांचे निधन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या हातात कारखान्याची सूत्रे आली होती.
परंतु 2019 साली परळीतून विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा यांचा पराभव झाल्यानंतर कारखान्यातील समीकरणे बदलली होती. त्यानंतर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकत्र येत कारखान्यात सत्ता स्थापन केल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.