पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठपुस्तकांमध्ये सन २०२४-२५ या नव्या शैक्षणिक वर्षात कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ हे इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी बालवाटिका, बालवाडी, अंगणवाडी तसेच पहिली व इयत्ता दुसरीसाठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ (जून २०२३) पासून पथदर्शी स्वरूपात इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरूपातील पाठ्यपुस्तके एकूण ४ भागांत उपलब्ध करून दिली आहेत.
या वर्षीही तशाच पद्धतीची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य विषयांच्या पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. तसेच वैकल्पिक विषयांची पाठ्यपुस्तके स्वतंत्ररित्या उपलब्ध करून दिली जातील.
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ हे इयत्ता पहिली व इयत्ता दुसरी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहणार आहे. त्यामुळे इयत्ता पहिली – दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिल्या आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमबजावणी करण्यात येणार असली, तरी राज्य शासनाकडून अद्याप पाठ्यपुस्तकामध्ये बदल करण्याबाबत कोणतेही आदेश बालभारतीला प्राप्त झालेले नाहीत. पाठ्यपुस्तकांमध्ये अचानक बदल करता येत नाही. त्यासाठी पुरेसा वेळ द्यावो लागतो. पाठ्यपुस्तके बदलायची असल्यास एक वर्ष आधी विक्रेत्यांना कळवावे लागते.- कृष्णकुमार पाटील, संचालक, बालभारती