सातारा – शासनाच्या शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे पूर्वप्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज ऑनलाइन शिक्षण देण्याबाबतचा आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना बजावला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शाळा, शिक्षण टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नाही. स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्यांना दिले आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात अंदाजे तारखा देण्यात आल्या आहेत. पूर्व प्राथमिक सोमवार ते शुक्रवार प्रत्येक दिवशी 30 मिनिटांपर्यंत पालकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करावे. पहिली ते दुसरी सोमवार ते शुक्रवार प्रत्येक दिवशी 30 मिनिटांची दोन सत्रे त्यापैकी 15 मिनिटे पालकांशी संवाद व मार्गदर्शन आणि 15 मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रम आधारीत शिक्षण देण्यात येणार आहे.
तिसरी ते आठवी प्रत्येक दिवशी 45 मिनिटांच्या दोन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, नववी ते बारावी प्रत्येक दिवशी 45 मिनिटांच्या चार सत्रांमध्ये ऑनलाइन शिक्षण देण्यात यावे. ऑनलाईन शिक्षण देताना इतर मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे, असेही आदेशात म्हटले आहे. वेळापत्रकाप्रमाणे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालये, खासगी सैनिकी शाळा, अध्यापक विद्यालयांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे.
असा आदेश सर्व 11 पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांना माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर व प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिला आहे.
सद्य परिस्थितीत शाळा, महाविद्यालये सुरु करणे धोकादायक आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला आहे. या काळात शाळा, विद्यालयांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. विद्यार्थ्यांकडे कमी कमी काळ मोबाईल राहावा, त्यांना मोबाइलची सवय लागू नये यादृष्टीने पावले उचलावीत. करोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.
– राजेश क्षीरसागर
(माध्यमिक शिक्षणाधिकारी, सातारा)