पुणे – राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना आणि राज्य शासनाच्या योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत ऑनलाइन ई रेशनकार्ड सुविधेकरीता सेवा शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे मोफत शिधापत्रिका मिळत असून ई रेशनकार्ड डाऊनलोड सुद्धा करून घेता येत आहे. मागील चार महिन्यात पुणे शहरातील सुमारे 9 हजार नागरिकांना ऑनलाईन रेशनकार्ड मिळाले आहे. ई रेशनकार्ड देण्याचे आदेशाची अंमलबजावणी 16 मे 2023 पासून सुरु झाली आहे. या सुविधेचा 100 टक्के वापर करावा. तसेच जास्तीत जास्त लोकांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अशी आहे प्रक्रिया…
रेशनकार्डसाठी शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर प्रचलित कार्यपद्धतीनुसार छाननी व तपासणी करण्यात येईल. त्यानंतर योजनेच्या प्रकारानुसार ऑनलाइन ई रेशनकार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. अर्जदारास या संकेतस्थळावरून रेशनकार्ड डाऊनलोड करून घेता येते.