उंब्रज -अपत्य प्राप्तीचे आमिष दाखवून लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात तळबीड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तळबीड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत तळबीड येथील एका दांपत्यास नारायण वाघ नावाचे भोंदूगिरी करणारे वैद्य, कोणतीही वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना औषधे देऊन गंडा घालत असल्याची माहिती दि. 16 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना माहिती मिळाली. या माहितीनुसार पोलीस अधीक्षकांनी संबंधित दांपत्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.
त्या दांपत्याने सांगितल्यानुसार, नारायण वाघ नावाच्या वैद्याने फोनवरून संपर्क साधून तुम्हाला अपत्य होण्याचे औषध आम्ही मोफत देतो, फक्त आमच्या मठाची 11 हजार रुपयांची पावती घ्यावी लागेल, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याच दिवशी चार लोक एका चारचाकी वाहनातून (क्रमांक एमएच 18 बीएक्स 4560) येऊन या दांपत्यास अपत्याबाबत औषध देतो, परंतु ती औषधे महाग आहेत. तुमची तुम्ही आणा, असे सांगून नंतर वेळोवेळी त्यांना त्यांच्या जवळची व शाही एजन्सी आयुर्वेदिक मेडिकल, सातारा येथून एक लाख 70 हजार पाचशे रुपयांची औषधे दिली.
दरम्यान, 14 ऑगस्ट रोजी पुन्हा तळबीड येथे येऊन त्या दांपत्याची मेडिकल कीटद्वारे टेस्ट करून संबंधित महिला गर्भवती असल्याचे सांगितले. ही टेस्ट कोणत्याही इतर डॉक्टरांकडून करून घेऊ नये, नाहीतर ती टेस्ट निगेटिव्ह येईल, असे सांगून पुन्हा 26 हजार रुपयांची औषधे घ्या, असे सांगितले. तेव्हा या दांपत्यास त्यांचा संशय आल्याने त्यांनी त्यांना औषधासाठी पैसे जमले की सांगतो असे सांगून त्यांची बोळवण केली. नंतर ती टोळी त्यांना औषध घेण्यासाठी वारंवार फोन करत होती. त्यामुळे त्यांनी कराड येथील डॉक्टरांकडे नियमित टेस्ट केली असता संबंधित महिला गर्भवती नसल्याचे समजले. त्यामुळे संबंधित लोकांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या विरोधात तळबीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
त्यानंतर हे संबंधित लोक तळबीड येथे असल्याचे दांपत्याने पोलिसांना सांगितले. तेव्हा तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वरोटे, पोलीस हवालदार ओंबासे, पोलीस नाईक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांनी या टोळीतील लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता जो इसम नारायण वाघ वैद्य म्हणून सांगत होता त्याचे खरे नाव राहुल धरमगिरी गोसावी (रा. तिरंगा नगर, साक्री, ता. साक्री, जि. धुळे) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्यासह साथीदार अश्विन अशोक गोसावी (रा. गोसावी वस्ती, वैद्यवाडी, हडपसर पुणे), शैलेश सुरेश गोसावी (रा. तिरंगा नगर, साक्री, ता. साक्री, जिल्हा धुळे), देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (रा. सुशीला नगर, साक्री, ता. साक्री, जिल्हा धुळे) अशी असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांनी सातारा जिल्ह्यातील बऱ्याच लोकांना अशा प्रकारे संपर्क साधून त्यांच्याकडूनही पैसे घेऊन फसवणूक केली असल्याची शक्यता आहे.
त्यामुळे संबंधितांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. वरोटे करीत आहेत. या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरीक्त पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शना -खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, आप्पा ओंबासे, पोलीस नाईक योगेश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल निलेश विभुते, प्रवीण गायकवाड, अभय मोरे, प्रवीण फडतरे यांनी सहभाग घेतला.