आता रक्ताचे नाही तर कर्माचे नाते महत्त्वाचे – पंकजा मुंडे

 कॉंग्रेस, राष्ट्रवादी जातीत तेढ निर्माण करत असल्याचा केला आरोप

शेवगाव: रामायण-महाभारतापासून रक्ताच्या नात्याने धोका दिल्याची उदाहरणे आहेत. आता रक्ताचे नाही तर कर्माचे नाते महत्त्वाचे आहे. लोकशाहीच्या यज्ञात नातेगोते न पाहता फक्त विकासाचे नाते व देशभक्तीची जात पाहून विकासाचे संरक्षण करणाऱ्या व्यक्ती मागे उभे राहण्याचे आवाहन ग्रामविकासमंत्री पंकजा ताई मुंडे यांनी केले.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी शेवगाव येथे आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी ना. मुंडे म्हणाल्या, कॉंग्रेसने दोन धर्मांत तेढ निर्माण करण्याचे, तर राष्ट्रवादीने जातीच्या नावाने लोकांना वेगळे करण्याचे काम केले. ज्येष्ठ नेते शरद पवार आम्हाला जातीयवादी बोलतात. परंतु पगडीवाल्या मुख्यमंत्र्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिले, तर धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारला सकारात्मक अहवाल दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस, सौभाग्य योजना, स्वच्छ भारत अभियान, शेतकऱ्यांना पीकविमा व निवृत्तिवेतन आदी योजना राबवत महिला व शेतकरी वर्गाला आधार देण्याचे काम केले. स्व. गोपीनाथ मुंडे व स्व. बाळासाहेब विखे यांच्या समाजसेवेचा व मैत्रीचा तीन पिढ्यांचा वारसा डॉ. सुजय विखे यांना आहे. डॉ. विखे हे संसदेत जाणारच आहेत. मात्र वारसा चालविणे ही तारेवरची कसरत असून, डॉ. विखे यांना ती जबाबदारीने पार पाडावी लागेल. खा. डॉ. प्रीतम मुंडे यांना लोकसभेत एक भाऊ पाहिजे म्हणून डॉ. विखे यांना तेथे पाठवा.

आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, या निवडणुकीत ही माझी विधानसभेची निवडणूक आहे, असे समजून प्रत्येक वाडीवस्तीवर जाऊन आपण व आपल्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला आहे. ना. मुंडे यांना अपेक्षित असे सर्वाधिक मताधिक्‍य डॉ. विखे यांना शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मिळेल. विरोधक स्व. राजीव राजळे यांच्याबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर टाकत आहेत. त्याची दखल घेऊ नका. अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन करून शरद पवार यांच्या सभेत एका जि. प. सदस्याने राष्ट्रवादीला पाठींबा दिला. बरे झाले ही कटकट गेली व वेळीच डॉ. विखे सावध झाले. अन्यथा नेहमीप्रमाणे मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांच्या कार्यकर्त्यांना उलटसुलट निरोप गेले असते, अशी टीका त्यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.