बेंगळूरु – “लव्ह जिहाद’च्या नावे धर्मांतर घडवून आणणे रोखण्यासाठी कर्नाटकमध्ये कठोर कायदा केला जाईल, असे सूतोवाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी केले आहे. “लव्ह जिहाद’च्या नावाने धर्मांतर घडवून आणले जात असल्याच्या बातम्या अलिकडच्या काळात वारंवार येऊ लागल्या आहेत. या संदर्भात इतर राज्यांनी काय केले अथवा काय नाही केले, हा पूर्णपणे वेगळा विषय आहे.
मात्र कर्नाटकमध्ये हे थांबवले जाईल. आपले सरकार याविरोधात कठोर पावले उचलणार आहे, असे येडियुरप्पा यांनी सांगितले. मंगळूरुमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते.
प्रेमाचे आणि पैशाचे आमिष दाखवून तरुण मुलींना धर्मांतर करायला भाग पाडले जात आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. सविस्तर आढावा घेतल्यानंतर या संदर्भात कठोर उपाय योजना केली जाईल, असे येडियुरप्पा म्हणाले.
कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यंनी बुधवारीच “लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे सूतोवाच केले होते. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी यांनीही अलाहबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसाऱ् कर्नाटकमध्ये विवाहासाठी धर्मांतरावर कर्नाटकमध्ये बंदी घातली जाईल, असे म्हटले होते.
अलाहबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केवळ विवाहासाठी केलेले धर्मांतर वैध नसल्याचे सांगितले. या संदर्भात एका नवदाम्पत्याने केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने हे स्पष्ट केले होते.