नागपूर – पुणेकरांना आज मेट्रोची भेट मिळाली आहे. यापाठोपाठ आता नागपूरकरांनाही मोठी भेट मिळणार आहे. नागपूरात लवकरच जमिनीवर नव्हे, तर हवेत बस धावताना दिसणार आहे. रस्ते निर्मितीमुळे रोडकरी अशी ख्याती मिळवलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूरात हवेतून चालणारी केबल बस सुरू करण्याचा सूतोवाच केला आहे.
दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेबाबत मागणी केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी उत्तरप्रदेशातील प्रयागराज पाठोपाठ नागपूरात ही हवेतून धावणारी बस अर्थात केबल बस सुरू करणार असल्याचे जाहीर केले. यासाठी गडकरी यांनी आराखडा तयार करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
ही केबल बस 35 ते 40 सीटर सध्या फिलिपिन्समध्ये चालवली जात असून त्याच धर्तीवर नागपूरात ही केबल बस सुरू केली जाईल, असे गडकरी म्हणाले आहेत. नागपूरातील ही केबल बस पारडीहून रिंगरोड मार्गे लंडन स्ट्रीटपर्यंत जाईल. तेथून हिंगणा टी पॉईंट, डिफेन्सवाडी येथून व्हेरायटी चौकापर्यंत पर्यंत जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.