मेलबर्न – सर्बियाचा अव्वल मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. मात्र, येथे दाखल होण्यापूर्वी त्याला व्हिसातील तांत्रिक चूक असल्याने विमानतळावरच रोखण्यात आले होते. त्यातही जोकोविचने स्पर्धेच्या आयोजकांसह ऑस्ट्रेलियाच्या सरकारवरही टीका केली होती. त्यात हस्तक्षेप करताना ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी त्याचा नक्षा उतरवताना थेट व्हिसाच रद्द केला आहे.
त्याने ऑस्ट्रेलियात दाखल होण्यासाठी व्हिसाची मागणी करताना जी कागदपत्रे सादर केली होती, ती अपूर्ण होती. तसेच त्यात अनेक तांत्रिक चुकाही होत्या. त्यातच आयोजकांनी त्याला लसीकरणाबाबत सवलत देण्याची तयारीही दाखवली होती.
मात्र, तरीही जोकोविच आपली भूमिका नरमाईची करत नव्हता. त्यामुळे अखेर देशाचा कायदा मोठा असून कोणालाही त्यात सवलत दिली जाणार नाही, असे स्पष्ट करत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिस यांनी त्याचा व्हिसाच रद्द केला असून आता त्याला नव्याने अर्ज करावा लागणार आहे किंवा स्पर्धेतूनच माघार घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, सर्बियाचे सरकार ऑस्ट्रेलियाच्या सरकारशी याबाबत संपर्क करणार असून लवकरच यातून तोडगा निघण्याचे संकेत देण्यात आले आहेत. मात्र, तब्बल 20 वेळा ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या एका जागतिक स्तरावरील मोठ्या खेळाडूला कायद्याचा बडगा दाखवणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे सध्या प्रचंड कौतुक होत आहे.