पारनेर -पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे आलेल्या करोनाबाधित व्यक्तीच्या मृत्युनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी कामकाजात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, निघोजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता म्हस्के पिंपरी जलसेन ग्रामपंचायतचे सरपंच शेवबाई घेमुड, ग्रामसेवक एस. बी. दुधाडे, तलाठी आशीर्वाद घोरपडे, कृषी सहाय्यक गावडे यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.
पिंपरी जलसेन येथे मुंबईवरून 3 मे रोजी आलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
हा पारनेर तालुक्यातील पहिला करोनाबळी ठरला. त्या मृत्युला त्या व्यक्तीचा निष्काळजीपणा जसा कारणीभूत ठरला तसा तो प्रशासनाचा हलगर्जीपणा देखील ठरला आहे. हे आता लपून राहिले नाही. तहसीलदार ज्योती देवरे यांनी पिंपरी जलसेन करोना ग्रामसुरक्षा समितीला नोटिस बजावली असून त्यात म्हटले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांन दिलेल्या आदेशाप्रमाणे या समितीने गावामध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये ठेवणे गरजेचे होते. मात्र ही व्यक्ती मुंबईहून गावात आली. त्याच वेळी तिला संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवणे गरजेचे होते. मात्र पिंपरी जलसेन येथील ग्रामसुरक्षा समितीने ते केले नाही.
व्यक्ती ही तिच्या नातेवाईकांच्या घरी तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये खासगी रुग्णालयात नातेवाईकांकडे निघोज, पठारवाडी, चिंचोली या गावामध्ये जावून आली असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव या सर्व परिसरात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समितीकडे सोपविलेले काम अत्यंत दक्ष राहून करणे गरजेचे होते, मात्र ते करतावेळी समितीकडून झालेला हलगर्जीपणा व गैरवर्तनबाबत आपत्ती व्यवस्थापननुसार कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत त्वरित खुलासा करावा असे म्हटले आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे व प्राथमिक आरोग्य केंद्र निघोजच्या डॉ. स्मिता म्हस्के यांना देखील नोटिस बजावली आहे. त्यात आरोग्य विभागाकडून या व्यक्तीबाबत हलगर्जीपणा झाला असल्याची नमूद करण्यात आले असून करोनाचे लक्षणे असलेल्या रुग्णाबाबत घ्यावयाच्या प्रतिबंधक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी न केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कामकाजात दुर्लक्ष करणारी ही बाब गंभीर स्वरूपाची आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्वांवर काय कारवाई होते. याकडे लक्ष लागले आहे.