पुणे – शहरातील गल्ली-बोळ, पथदिवे, मुख्य चौक तसेच जागा मिळेल तिथं अनधिकृत फ्ल्केस, बोर्ड लावून शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार असलेल्या अनधिकृतपणे जाहिराती लावणाऱ्या तसेच होर्डिंग उभारणाऱ्यांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आकाशचिन्ह विभागाला दिले आहे. मात्र, आयुक्तांच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावत या बेकायदेशीर जाहीरातदारांना अभय देत कारवाई होत असल्याचे दाखविण्यासाठी शहरातील व्यावसायिकांना दुकानाच्या समोर व्यवसायाच्या लावलेल्या फलकांवरून आकाशचिन्ह विभागाचे कर्मचारी नोटीसा बजावित आहेत. विशेष म्हणजे, महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या नियमावलीनुसार, व्यावसायिकांना आपल्या दुकानाच्या वर तीन फूट उंच आणि दुकानाच्या दर्शनी भागाच्या आकाराएवढया लांबीचा जाहीरात फलक लावण्यास मुभा आहे. मात्र, केवळ आयुक्तांना कारवाईचा आकडा दाखविण्यासाठी व्यावसायिकांना नोटिसा बजाविण्यात येत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
काय आहेत आयुक्तांचे आदेश
शहरात महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात सुमारे साडेतीन हजार होर्डिंग आढळून आले आहेत. त्यातील सुमारे 1900 होर्डिंग हे अनधिकृत आहेत. तर शहराच्या सर्व प्रमुख चौक, गल्ली बोळ अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात राजकीय पक्ष, बस थांबे, महापालिकेचे पथदिवे, पदपथावर मोठ्या प्रमाणात फ्लेक्स, बोर्ड, झेंडे लावलेले आहेत. याची संख्या लक्षणीय असून, यामुळे मोठ्या प्रमाणात शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यातच, शहरात जानेवारी महिन्यात जी 20 देशांची शिखर परिषद असून, केंद्राकडून शहर स्वच्छ तसेच विद्रुपीकरण मुक्त ठेवण्याच्या सूचना महापालिकेस देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयुक्तांनी अशा अनधिकृत जाहिरातीच्या प्रत्येक फ्लेक्स, बोर्डसाठी एक हजाराचा दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन महिन्यांच्या आत सर्व अनधिकृत होर्डिंग कारवाई करून काढून टाकण्याचे आदेश आहेत. तसेच वारंवार जाहिराती लावणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
अनेक व्यावसायिकांनी दुकाना ऐवजी कंपन्यांच्या जाहीराती केलेल्या आहेत. अशा जाहीरातींची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून त्यांनी मान्यतेपेक्षा जादा आकाराचे फलक लावलेल्या असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
– माधव जगताप, उपायुक्त, आकाशचिन्ह आणि परवाना विभाग
कारवाईचा रोख भलतीकडेच
महापालिका आयुक्तांच्या आदेशामुळे आकाशचिन्ह विभागाचे कर्मचारी आणि आकाशचिन्ह निरिक्षकांची कोंडी झाली असून, कारवाई होत असल्याचे दाखविण्यासाठी तसेच बेकायदेशीर जाहीरातदारांना अभय देण्यासाठी आकाशचिन्ह विभागाकडून शहरातील व्यावसायिकांना लक्ष करण्यात येत आहे. नियमानुसार, व्यावसायिकांना आपल्या दुकानाच्या वर तीन फूट उंच आणि दुकानाच्या दर्शनी भागाच्या आकाराएवढ्या लांबीचा जाहिरात फलक लावण्यास मुभा आहे. त्यानुसार, अनेकांनी असे फलकही लावलेले आहेत. मात्र, त्यानंतरही आकाशचिन्ह विभागाचे कर्मचारी व्यावसायिकांकडे जाऊन त्यांना नोटिसा बजावित आहेत. दुकानासमोर लावलेले फलक मोठे असल्याने आकाशचिन्ह विभागाकडे अर्ज करावा, तसेच नव्याने परवानगी घ्यावी, अशा नोटिसा बजावून कारवाईचा इशारा देत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये नारजी आहे.