पुणे – वस्तू व सेवा कर (जीएसटी) मसुदा तयार केल्यानंतर त्यामध्ये विविध महत्वाच्या सूचना, बदल सांगण्यापासून ते “जीएसटी’ यशस्वीपणे संकलन करण्यात सनदी लेखापाल महत्वाची भूमिका बजावत आहेत, “आयसीएआय’च्या सक्रिय सहभागाने “जीएसटी’मध्ये सुसूत्रता येत आहे. “जीएसटी’ची प्रभावी अंमलबजावणी होण्यात सनदी लेखापालांचे मोलाचे योगदान आहे, असे मत राज्याच्या जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय आखाडे यांनी व्यक्त केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) जीएसटी व इन्डायरेक्ट टॅक्सेस कमिटी आणि “आयसीएआय’ पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “जीएसटी’वरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आखाडे यांच्या हस्ते झाले. “आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात परिषद झाली. “उद्धारणम-शेअरिंग नॉलेज’ अशी या परिषदेची संकल्पना आहे. 550 पेक्षा अधिक सनदी लेखापाल या परिषदेत सहभागी झाले होते.
याप्रसंगी “आयसीएआय’च्या जीएसटी कमिटीचे अध्यक्ष सीए राजेंद्र कुमार, उपाध्यक्ष सीए उमेश शर्मा, विभागीय समितीच्या सदस्य सीए ऋता चितळे, आयसीएआय पुणेचे अध्यक्ष सीए काशिनाथ पठारे, उपाध्यक्ष सीए राजेश अगरवाल, सचिव सीए प्रितेश मुनोत, खजिनदार सीए प्रणव आपटे, “विकास’च्या चेअरपर्सन सीए मौसमी शहा, परिषदेचे समन्वयक सीए अजिंक्य रणदिवे, सदस्य सीए अमृता कुलकर्णी, सीए सचिन मिनियार, सीए ऋषिकेश बडवे आदी उपस्थित होते.
देशात 2017 मध्ये जीएसटी लागू केल्यापासून आजवर पाच वर्षांत त्यामध्ये अनेक बदल झाले. सर्वाधिक बदल “आयसीएआय’ने सूचवले आहेत. “जीएसटी’मधील त्रुटी दूर करण्याचे काम केले आहे. भारताला आर्थिकदृष्टया स्पर्धात्मक तसेच पारदर्शक बनवण्यात जीएसटीचा मोलाचा वाटा आहे. जीएसटीच्या रूपाने एक परिणामकारक कर प्रणाली राबवण्यात आली आहे, असे आखाडे यांनी स्पष्ट केले आहे. प्रास्ताविक काशिनाथ पाठारे यांनी केले. सूत्रसंचालन सायली चंदालिया यांनी केले. आभार प्रितेश मुनोत यांनी मानले.