पुणे – शहरात धडक तपासणी मोहिमेअंतर्गत 570 सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात आली. यापैकी 36 सोनोग्राफी केंद्रांत काही प्रमाणात अनियमितता आढळल्याने त्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून उत्तरे आल्यावर पुढे कारवाई केली जाणार आहे.
वर्धा जिल्हयातील 13 वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात प्रकरणानंतर राज्याच्या आरोग्य विभागाला जाग आली. आरोग्य खात्याने प्रत्येक जिल्ह्यांतील सोनोग्राफी आणि गर्भपात केंद्रांची धडक तपासणी करण्याचे आदेश सर्व जिल्ह्यांना दिले. यानुसार दि.20 जानेवारी ते 20 फेब्रुवारीपर्यंत ही तपासणी करण्यात आली आहे. पुणे शहरात एकुण 632 सोनोग्राफी तपासणी केंद्र आहेत. त्यापैकी आतापर्यंत 570 केंद्रांची तपासणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी 36 केंद्रांमध्ये मासिक अहवाल वेळेवर सादर न करणे, त्यांनी दिलेली माहिती न जुळणे, काही फॉर्मवर सही नसणे या अनियमितता तसेच त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, सन 2017 ला सांगलीतील म्हैसाळ येथे गर्भपात करताना स्वाती जमदाडे या 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच गर्भपात केलेल्या 19 बालकांचे अवशेष आढळल्यानंतर डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्यावर कारवाई झाली होती. त्यानंतरही आरोग्य विभागाने अशी मोहीम राबवली होती.