पुणे- महापालिका प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकती आणि सूचनांच्या सुनावणींचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. मात्र, त्यात 58 मधील सहा प्रभागांचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रशासनाने यावर खुलासा करत “या प्रभागांबद्दल आलेल्या हरकती या त्यांच्याशी जोडलेल्या शेजारच्या प्रभागांशी संदर्भात आहेत. त्यासोबत सुनावणी घेतली जाणार आहे,’ असे म्हटले आहे.
पालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालय हद्दीतून 3 हजार 596 हरकती सूचना आलेल्या आहेत. यावर सुनावणी घेण्यासाठी “यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम हे प्राधिकृत अधिकारी आहेत. याची माहिती व हरकतदारांच्या नावानुसार सुनावणीचे वेळापत्रकने जाहीर केले आहे. त्यात अनेक प्रभागांच्या हरकती एकसारख्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून आयोगाच्या सूचनेनुसार, एकसारख्या हरकतींची गटाने सुनावणी घेतली जाणार आहे. दि.24 आणि 25 फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय सुनावणी घेतली जाणार आहे. पण, यामध्ये केवळ 52 प्रभागांचे वेळापत्रक आहे. सहा प्रभागांचा समावेश नसल्याने तेथील नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. या नाव नसलेल्या प्रभागांमध्ये 24,32, 34, 36, 52 आणि 58 क्रमांकाच्या प्रभागाचा समावेश आहे. तर प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक 58 याबद्दल एकही हरकत व सूचना नोंदविली गेली नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
प्रभाग रचनेचे वेळापत्रक हरकतींनुसार जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकात ज्या सहा प्रभागांचे क्रमांक नाहीत, त्या सर्व प्रभागांच्या हरकती प्रामुख्याने शेजारच्या प्रभागाच्या सीमारेषेशी संबंधित आहेत. त्यामुळे ते दुसऱ्या प्रभागाच्या सुनावणीत घेतले आहेत. याबाबत हरकतदारांना स्पष्ट कल्पना देण्यात आली असून त्यांना टपाल, मेसेजद्वारे ही माहिती आणि वेळ कळविली जाणार आहे.
– अजित देशमुख, उपायुक्त, निवडणूक विभाग, मनपा