ऍप वापरण्यासाठी इंटरनेट असण्याची गरज नाही
पुणे – दृष्टी कमी असलेल्यांना नोटा ओळखता याव्या याकरिता रिझर्व्ह बॅंकेने मानी म्हणजे मोबाइल ऐडेड नोट आयडेंटिफायर हे मोबाइल ऍप लॉच केले आहे.
नोटा ओळखण्यासाठी दृष्टी अधू असलेल्यांना त्रास होत असल्याच्या बऱ्याच तक्रारी आल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने हे विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यामुळे केवळ मोबाइलच्या साह्याने दृष्टी कमी असलेले लोक विविध प्रकारच्या नोटा ओळखून व्यवहार करू शकणार आहेत.
नोटाबंदीनंतर अशा प्रकारच्या ऍपची गरज असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या ध्यानात आले होते. त्यानंतर अशा प्रकारचे ऍप विकसित करण्यात आले आहे. या ऍपचा शुभारंभ रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या हस्ते झाला. ऍपच्या साह्याने दृष्टी अधू असलेले लोक नोटा ओळखू शकतील. हे चालू राहण्यासाठी इंटरनेट नसले तरी चालते असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बॅंकेने केले आहे. हे ऍप अँड्रॉइड आणि आयओएस ऍप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे. मोबाइलच्या कॅमेऱ्याने नोट स्कॅन केल्यानंतर हिंदी किंवा इंग्रजी भाषेत नोट किती रुपयाची आहे याची माहिती मिळते.
नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बॅंकेने 10, 20, 50, 100, 200, 500 आणि 2 हजार रुपयांच्या विविध आकाराच्या नोटा व्यवहारात आणल्या आहेत. या नोटांचे आकार वेगवेगळे असल्यामुळे दृष्टी कमी असलेल्यांना या नोटा ओळख याव्यात अशी अपेक्षा होती. मात्र, या नोटा ओळखता येत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने ही उपाययोजना केली आहे. या ऍपमधून नोट खरी आहे की बनावट आहे हे मात्र, ओळखता येत नसल्याचे स्पष्टीकरण रिझर्व्ह बॅंकेने दिले आहे.