दखल: पुन्हा एकदा हिंदी-चिनी भाई भाई?

स्वप्निल श्रोत्री

चीन आणि भारत शेजारी राष्ट्र आहेत. त्यामुळे एका मर्यादेपेक्षा जास्त कटुता उभय राष्ट्रांच्या संबंधात येणे किंवा संघर्षाची वेळ येणे हे परवडण्यासारखे नाही. त्यामुळे मैत्री व विश्‍वास संपादित नाही झाला तरी चालेल परंतु, संभाषण तुटता कामा नये. कारण जेथे संभाषण नसते, तेथे गैरसमज येतात आणि गैरसमज हे संघर्षाला जन्म देतात.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील दुसरी अनौपचारिक बैठक तमिळनाडूच्या ममल्लापुरम्‌ (महाबलीपुरम्‌) येथे नुकतीच पार पडली. अपेक्षेप्रमाणे ही बैठक यशस्वी झाली असली तरीही भारत दौऱ्यावर येण्याआधी चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानचा दौरा करून भारताला पाकिस्तानप्रती आपल्या असलेल्या मैत्रीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. चीनच्या ह्या कृतीचे विविध वृत्तपत्रातील लेखकांनी व आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांनी आपल्या परिने वर्णन व टीका केली असली तरीही त्याने या बैठकीचे महत्त्व कमी होत नाही.

सध्या चीनची सर्व शक्‍ती ही अमेरिकेशी संघर्ष करण्यात खर्ची होत आहे. त्यामुळे शेजारी तुल्यबळ असलेल्या भारताशी संघर्ष करण्याची चीनची सध्यातरी इच्छा नाही तर भारताची वायव्य सीमा ही पाकिस्तानला लागून असल्यामुळे कायमच धगधगती असते अशा वेळी चीनला अंगावर घेऊन ईशान्य सीमासुद्धा असुरक्षित करण्याची भारताची मनीषा नाही. त्यामुळेच भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी ममल्लापुरम्‌ येथे झालेली नरेंद्र मोदी व शी जिनपिंग यांची अनौपचारिक भेट दोन्ही राष्ट्रांसाठी तितकीच महत्त्वपूर्ण होती.
भारताचे चीनशी असलेले राजकीय संबंध हे ऐतिहासिक काळापासून असून त्यासंबंधीचे अनेक पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत.

चीनमध्ये बौद्ध धर्माचे पालन केले जाते तर भारत हे बौद्ध धर्माचे उगमस्थान आहे. चिनी भिक्‍खू फहियान (राजा चंद्रगुप्त दुसरा याच्या काळात), युआन श्‍वांग (सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात नालंदा विद्यापीठात 2 वर्षे राहिला) व नागसेन (कनिष्क राजा मिनॅंडर ऊर्फ मिलिंद याच्या दरबारात) यांनी भारताला भेटी दिल्याची उदाहरणे इतिहासात आहेत. वर्तमानात भारत व चीन यांच्यात 3,380 किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा असून या सीमेवरून दोन्ही राष्ट्रात अनेक वर्षांपासून वाद आहेत. बऱ्याच वेळा सीमावादावरून उभय राष्ट्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा प्रत्यय 1962 मध्ये झालेले भारत-चीन युद्ध व 2017 मध्ये डोकलाममध्ये झालेली युद्धजन्य परिस्थिती यावरून दिसून येतो. परंतु, गेल्या 2 वर्षांपासून भारत व चीन संबंधात बऱ्यापैकी परिपक्‍वता आली असून संघर्षाचे प्रसंग जर उद्‌भवले तर चर्चेने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो.

सध्या भारत व चीन यांच्यात खालील मुद्द्यांवरून विवाद आहेत.

1) भारत व चीन सीमावाद: भारत व चीन सीमावाद गेल्या 70 वर्षांपासून असून भारताच्या अनेक प्रदेशांवर चीनने आपला हक्‍क सांगितला आहे. यावरून भारत व चीन यांच्यात 1962मध्ये युद्ध झाले असून आजही बऱ्याच वेळा संघर्षाचे प्रसंग उद्‌भवतात.

2) अरुणाचल प्रदेश व लडाखची समस्या: ईशान्य भारतात असलेले अरुणाचल प्रदेश व जम्मू-काश्‍मीरमधील लडाख प्रदेश हे भारताचे अंग असून त्यावर चीनने आपला हक्‍क सांगितलेला आहे. चीनच्या नकाशात हे दोन्ही प्रदेश चीनचा भाग असल्याचे दाखविण्यात येते. त्यामुळे अरुणाचल प्रदेश व लडाखमधील पर्यटकांसाठी सर्वसामान्य व्हिसा न देता स्टेपल व्हिसा देऊन चीनमध्ये प्रवेश देण्यात येतो.

3) बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह व सीपेक: चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला भारताने सुरुवातीपासूनच केलेला विरोध भारत-चीन संबंधात कटुता येण्याचे हे एक कारण समजले जाते. याच प्रकल्पाचा एक भाग असलेल्या सिपेक अर्थात चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर चीनने भारताची परवानगी न घेता भारताच्या जम्मू-कश्‍मीरमधून नेल्यामुळे दोन्ही राष्ट्रांमध्ये आरोपांच्या फैरी झडल्या आहेत.

4) हिंदी महासागर आणि दक्षिण चीन समुद्र: गेल्या काही वर्षांपासून चीनच्या हिंदी महासागरातील हालचाली वाढत असून दक्षिण चीन समुद्रावर चीनने आपला हक्‍क सांगितला आहे. भारताच्या दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरातील छोट्या-मोठ्या बेटांचे आधुनिकीकरणाचे काम चीनने हाती घेतले असून भविष्यात त्याचा उपयोग लष्करी कामासाठी करून भारताला घेरण्याचा चीनचा प्रयत्न आहे असा भारताचा आरोप आहे.

5) एन. एस. जी: एन. एस. जी. अर्थात न्यूक्‍लियर सप्लायर ग्रुपच्या भारताच्या सदस्यत्वाला केवळ चीनच्या विरोधामुळे मुहूर्त मिळालेला नाही.

6) कॉड ग्रुप: 2017 मध्ये भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपान यांनी एकत्र येऊन कॉड ग्रुप तयार केला. चीनच्या म्हणण्यानुसार हा ग्रुप चीनच्या विरोधात बनवण्यात आला असून लष्करी आघाडी उघडण्यासाठी ह्याचा वापर होत आहे.

7) भूतान व नेपाळशी संबंध: आशिया खंडातील भूतान हे असे एकमेव राष्ट्र आहे ज्याचे चीनशी कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या राजनैतिक व कोणतेही संबंध नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून चीनचे भूतानशी संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न असून केवळ भारताच्या सांगण्यामुळे भूतान चीनपासून लांब राहात असल्याचा चीनचा आरोप आहे. नेपाळच्या आंतरराष्ट्रीय धोरणात भारताचा हस्तक्षेप असतो असेही चीनचे म्हणणे आहे.

8) पाण्याची समस्या: भारतातील ब्रह्मपुत्रा नदी जी चीनमध्ये त्सांग-पो या नावाने ओळखली जाते. ह्या नदीच्या पाण्यावरून भारत व चीन यांच्यामध्ये मतभेद आहेत. भारताचा असा आरोप आहे की चीन ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्यावरती मोठे धरण बांधून त्या नदीचा प्रवाह चीनच्या दुष्काळी भागात वळवित आहे. त्यामुळे भारताच्या वाट्याला कमी पाणी येऊन ईशान्य भारतात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होईल.

9) व्यापार असमतोल: भारत व चीन या दोन राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा मोठ्या प्रमाणावर असून जवळपास 60 अब्ज डॉलरचा वार्षिक तोटा भारताला दरवर्षी होत असतो. भारताचा असा आरोप आहे की चीन भारतीय उत्पादनासाठी आपल्या बाजारपेठा उघडत नाही परिणामी भारताला दरवर्षी वाढीव तोटा होतो.

गेल्यावर्षी चीनच्या वुहानमध्ये झालेल्या बैठकीच्या पहिल्या सत्राचे फळ म्हणून चीनने आपली बाजारपेठ भारतासाठी बऱ्यापैकी उघडी करून 2 राष्ट्रांमध्ये असलेला व्यापार समतोल राखण्याचा प्रयत्न केला. फेब्रुवारी 2019 मध्ये जेव्हा भारताच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाला तेव्हा इतर राष्ट्रांप्रमाणे चीनने ह्याचा निषेध केला. जैश-ए-महमंदचा प्रमुख दहशतवादी मसुद अजहरला संयुक्‍त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर होण्यापासून 4 वेळा वाचविणारा चीन नंतर कोणताही खोडा न घालता भारताच्या मदतीला आला. थोडक्‍यात, गेल्यावर्षी झालेल्या बैठकीचे फलीत म्हणून यावर्षी भारत-चीन संबंधात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.