मला आमदार व्हायचंय!

काम हेच आमदार होण्यासाठी केलेली गुंतवणूक! भारत हा जगातील सर्वाधिक मोठा यशस्वी लोकशाहीप्रधान देश आहे. अशा गुळगुळीत वाक्‍यांनी लोकशाही कधीच प्रगल्भ होत नाही. भारतीय नागरिक नेहमी नेत्याच्या शोधात रहात आलेला आहे. त्याला नेता होण्याची कितीही इच्छा असली तरीही तो कायम समूहामध्ये आपली ओळख शोधत आला आहे.

राजकीय इच्छाशक्ती ही प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात असते. लोकशाही ही केवळ निवडणुका आल्या की घसा कोरडापडेपर्यंत आरोळ्या मारण्याची प्रक्रिया नाही. इथे पाच वर्ष एक सजग अन्‌ जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका मांडली पाहिजे. आणि विशेष करून ती मांडत असताना तिला कृतीची जोड देणे क्रमप्राप्त ठरते. स्वातंत्र्याच्या 70 वर्षाच्या कार्यकाळात लोकशाही प्रक्रिया अधिक लोकाभिमुख व्हायला पाहिजे होती. मात्र ती तशी झालेली दिसत नाही. आजही ती काही लोकांच्या आणि घराण्यांच्या दावणीला बांधलेली आहे!

पैसा, प्रसिध्दी, सत्ता या सगळ्या गोष्टी त्या विशिष्ट पदाबरोबर येत असतात मात्र, सध्या राजकीय मूल्य जपत शेवटच्या माणसासाठी काम करणारी राजकीय पिढी घडणे आवश्‍यक आहे. 288 आमदारांपैकी आपल्याला केवळ बोटावर मोजण्याइतपत नावेच का चांगली वाटावीत? एकदा उमेदवाराला निवडून दिले की झाले मग! पुन्हा तो पुढच्या निवडणुकीलाच आपल्या भेटीला येतो. ज्यांना आमदार व्हावेसे वाटते त्यांनी अगोदर आपल्या भागातील समस्या अन्‌ त्यावरील वास्तववादी शक्‍य असणारे उपाय शोधून त्यावर तत्काळ काम चालू केले पाहिजे.

2024 ची तयारी निवडणुकांचे बिगूल वाजल्यास सुरू करण्यापेक्षा, आतापासून जर केली तर तुम्हाला आमदार होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. बोलण्यापेक्षा अन्‌ मोकार गप्पा मारण्यापेक्षा वास्तवामध्ये जर काही आपल्याला भरीव करता आले तर खूप मोठा बदल आपण आपल्या भागात घडवू शकतो.
राजकारण हा काही मोकळ्या वेळेत करण्याचा व्यवसाय नाही. त्याला संपूर्णपणे वाहून घेणारी माणसांची गरज असते.

ज्यांना खरेच सामाजिक प्रश्‍नांची जाण आहे, ज्यांना लोकांसाठी काम करायचे आहे अशा तरूणांना आज राजकारणात स्वत:ला सिद्ध करण्याची खूप मोठी संधी उपलब्ध आहे. आजच्या काळात सगळ्याच गोष्टींना पैसा लागतो, हे जरी खरे असले तरी तुम्ही प्रमाणिकपणे काम करीत गेलात तर एक वेळ अशी येते ज्यावेळी तुमचे काम हीच तुमची ओळख बनते. आव्हाने कितीही मोठी असली तरी ज्याची नाळ सामान्य माणसाशी आहे अन्‌ ज्याने अगदी स्थानिक पातळीवर काम केले आहे त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. भारतीय लोक राजकीय साक्षर झाले मात्र त्यांनी राजकीय प्रगल्भ होण्याची नितांत गरज आहे.

-श्रीकांत येरूळे

Leave A Reply

Your email address will not be published.