काहींना निम्मे; तर अनेक कामगार वेतनापासून वंचित
पुणे – लॉकडाऊनमुळे खासगी आस्थापना व लघु उद्योगांमधील कामगारांची पेमेंट शीटच तयार झालेली नाही. त्यामुळे काही कंपन्यांनी कामगारांच्या खात्यावर संपूर्ण, तर काहींच्या खात्यावर निम्मे वेतन जमा केले आहे. शिवाय, अनेकांच्या वेतनाचा पत्ताच नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात जगायचे तरी कसे? असा प्रश्न हे कामगार विचारत आहेत.
लॉकडाऊन काळात गरिबांना फटका बसणार नाही याकरिता कार्यालये व कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची वेतन व मनुष्यबळ कपात करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र, त्याला खासगी कार्यालये आणि कंपन्या हरताळ फासत आहेत. अनेक कंपन्यांनी कामगारांचे महिन्याचे निम्मेच वेतन बॅंक खात्यावर जमा केले आहे. तर अनेक लघुद्योगांमधील कामगार वेतनाशिवाय आहेत.
लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने कामगारांचे वेतन झाले नाही तर, दुसरीकडे जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार सुरू आहे. नागरिकांना चढ्यादराने किराणा माल विकत घ्यावा लागत आहे. अशातच महिन्याचा किराणा माल देणाऱ्या दुकानदाराकडून रोखीत माल विकत घेण्याची आदेशवजा विनंती केली जात आहे. अशा दुहेरी कात्रीत कामगार सापडला आहे.
कामगारांचे वेतन जमा करणारे कर्मचारी गावाला गेले आहेत; तर अनेक जणांना लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडता येत नाही. तसेच कंपनीची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे वेतनकपात होण्याची कामगारांची मानसिकता आहे. तर बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील कामगारांचे संपूर्ण वेतन जमा झाल्याचे आशादायक चित्र आहे.