मुंबई – अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलिवूडमध्ये नेहमीच कहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. इंडस्ट्रीत अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. बॉलिवूडमध्ये यशस्वी झाल्यानंतर अनेक जण हॉलिवूडमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतात तर काहीजण साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील आपलं नशीब आजमावता. मात्र नवाजला यापैकी एकाही इंडस्ट्रीमध्ये न जात गुजराती चित्रपटांमध्ये काम करायचे आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नावाजने गुजराती चित्रपटांमध्येही काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या अभिनेत्याने गुजराती चित्रपट करण्यामागचे कारणही सांगितले आहे.खरं तर, अलीकडेच अभिनेत्याने गुजरातमधील वडोदरा येथे भेट दिली, त्यानंतर तो शहराबद्दल नॉस्टॅल्जिक झाला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याने खुलासा केला की त्याच्याकडे वडोदराशी अनेक जुन्या आणि भावनिक आठवणी जोडल्या गेल्या आहेत.
30 वर्षांनंतर वडोदरात परतल्यानंतर त्या सुंदर आठवणी त्यांच्यासाठी ताज्या झाल्या. त्याचे गुजरातवर प्रेम आहे आणि त्याचे काही चांगले गुजराती मित्रही आहेत. त्याला काही चांगल्या ऑफर आल्यास गुजराती चित्रपटात काम करायला आवडेल, असे तो यावेळी म्हणाला.
वडोदरामधील माझे वास्तव्य हे माझ्या करिअरमधील टर्निंग पॉइंट असल्याचे अभिनेत्याने सांगितले. मी आधी सायन्सचा विद्यार्थी होतो, पण इथे आल्यानंतर मी परफॉर्मिंग आर्ट्सकडे वळलो. मी पहिल्यांदा वडोदरात नाटक पाहिलं आणि त्यानंतर काही नाटकं इथे केली, त्यात गुजराती नाटकंही होती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी मी महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा येथे परफॉर्मिंग आर्ट्सचे शिक्षण घेतले होते, त्यामुळे माझा थिएटरमधील प्रवास तिथूनच सुरू झाला असल्याचे नवाजने यावेळी स्पष्ट केले आणि म्हणूनच चांगल्या कलाकृतीची ऑफर आल्यास गुजराती सिनेमा करायला आवडेल असं नवाज यावेळी म्हणाला.