नवी दिल्ली – ज्या लोकांनी वीजेवर सबसीडीचा पर्याय स्विकारला आहे, त्याच लोकांना येत्या 1 ऑक्टोबरपासून सबसीडी दिली जाईल असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. दिल्लीत 200 युनीटपर्यंत वीज मोफत आहे.
201 ते 400 युनीटपर्यंतच्या वीज वापरावर सरकारकडून 800 रूपये सबसीडी दिली जाते. मात्र आता ही सबसीडी केवळ त्याच लोकांना दिली जाणार आहे, ज्यांनी अगोदर त्याचा पर्याय स्वीकारला होता, असे केजरीवाल यांनी आज नमूद केले.
अलिकडेच पंजाब राज्यात झालेल्या निवडणुकीत केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाने मोफत विजेचे आश्वासन पंजाबच्या नागरिकांनाही दिले आहे. मात्र दिल्लीतील त्यांच्या आजच्या घोषणेनंतर पंजाबमध्येही नागरिक धास्तावले असण्याची शक्यता आहे.
लवकरच हिमाचल प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. तेथे हेच आश्वासन देण्याची केजरीवालांची तयारी होती. मात्र आता त्यांचा यू टर्न त्यांच्या पक्षाला संशयाच्या पिंजऱ्यात उभा करू शकतो. शिवाया केजरीवाल यांचा विरोध करणारे पक्ष हा मुद्दा निवडणुकांमध्ये जोरकसपणे मांडण्याचीही शक्यता यामुळे बळावली आहे.