परवानगीविनाच ढोल-ताशा पथकांचा ‘आवाज’

पुणे -परवानगी नसतानाही नदीपात्रात मंडप मारून ढोलताशा प्रॅक्‍टिसला पथकांनी सुरुवातही केली आहे. त्यांनी विनापरवानगी मंडप मारले असून, खुद्द खासदारांनी याठिकाणी येऊन वाद्यपूजन केले आहे.

गणेशोत्सव महिन्यावर आल्याने नदीपात्रात मंडप मारून ढोलताशापथक प्रॅक्‍टिस करतात. मात्र, मंडप किंवा वादनासाठी त्यांना महापालिकेची परवानगी आवश्‍यक आहे. पण, त्यांनी अजून या परवानग्या घेतल्या नाहीत. तसेच महापालिकेच्या मालमत्तेमध्ये त्यांनी मंडप मारले आहेत. याला मालमत्ता व्यवस्थापन विभागाने परवानगीही दिली नाही. तरीही, मंडपांवर कारवाईही केली जात नसल्याचे दिसून आले आहे. खासदार गिरीश बापट यांनी रविवारीच वाद्यपूजन केले. एवढेच नव्हे, तर “परवानगी देण्यासंदर्भात आयुक्तांशी बोलतो’ असेही म्हणाले. परंतु जेथे हा कार्यक्रम झाला त्या मंडपाला परवानगी होती किंवा नाही, याचीही शहानिशा केली गेली नाही. सध्या नदीपात्रात दिसेल त्या जागेवर मंडप मारून ढोलपथकांनी प्रॅक्‍टिस सुरू केली आहे. यासाठी परवानगीही घेतली जात नसून ढोलपथकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांनाही एवढ्या आवाजाचा त्रास होतो. काहींनी याबाबत तक्रारही केली आहे. “उत्सवाला आमची ना नाही परंतु एवढ्या लवकर अशाप्रकारची ऍक्‍टिव्हिटी सुरू करणे याला विरोध आहे,’ असे त्यांचे म्हणणे आहे.

महापालिका आणि पथकांच्या प्रमुखांनीही संयमित भूमिका घेतली पाहिजे. नागरिकांना त्रास होतो, याविषयीच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र, उत्सवकाळात थोडी समजूतदारपणाची भूमिका घेणे आवश्‍यक आहे. पथकामध्ये अनेक नवे वादक येतात. तसेच वर्षभर प्रॅक्‍टिस नसल्याने किमान महिनाभर प्रॅक्‍टिस करावी लागते. कोणालाही त्रास अथवा अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी पथकांचे मंडप असतात. या मंडपांच्या परवानगीबाबत खासदार गिरीश बापट हे आयुक्तांशी बोलणार आहेत, असे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.
– पराग ठाकूर, अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ.


नदीपात्रातील मंडपांसंदर्भात अतिक्रमण नियंत्रण विभागाने मालमत्ता व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला आहे. मात्र, तेथून कोणतेही आदेश आलेले नाहीत. कारवाईसाठी आम्ही तयार आहोत.
– माधव जगताप, विभाग प्रमुख, अतिक्रमण नियंत्रण, मनपा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.