पॅरिस – फ्रान्सचे संशोधक ल्यूक मॉंटग्नियर यांचे वयाच्या 89व्या वर्षी निधन झाले. त्यांना एचआयव्ही व्हायरसचा शोध लावल्याप्रकरणी 2008 साली नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मॉंटग्नियर यांनी पॅरिस उपनगरातील न्यूली-सुर-सीन येथे अखेरचा श्वास घेतला. याबद्दल फ्रान्स सरकारने माहिती दिली आहे.
मॉंटग्नियर यांनी एचआयव्ही विषाणू शोधण्यासाठी प्रचंड मेहतन घेतली होती. मात्र, नंतरच्या वर्षांत त्यांनी विज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांना आव्हान देणारे काही प्रयोग करून सहकाऱ्यांपासून स्वतःला दूर केले. करोना व्हायरस आल्यानंतर ते करोना प्रतिबंधात्मक लसींना जाहीरपणे विरोध करत होते.
मॉंटग्नियर यांचा जन्म 1931 मध्ये मध्य फ्रान्समधील चाब्रिस गावात झाला होता. मॉंटग्नियर यांनी पॉइटियर्स आणि पॅरिसमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला. ते 1960मध्ये नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्चमध्ये रुजू झाले आणि 1972मध्ये पाश्चर इन्स्टिट्यूटच्या व्हायरोलॉजी विभागाचे प्रमुख बनले.
दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एका लेखी निवेदनात ल्यूक मॉंटग्नियर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांची एड्सविरूद्ध लढाई खूप मोठी होती आणि त्यासाठी त्यांचे योगदान अमुल्य होते, असे म्हणत मॅक्रॉन यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.