नोबल पारितोषिक विजेत्या आंग सान स्यू की यांना 4 वर्षांची शिक्षा

बॅंकॉक – म्यानमारच्या माजी राष्ट्रीय समन्वयक आणि  जागतिक पातळीवरील सर्वोच्च नोबल पारितोषिक विजेत्या आंग सान स्यू की यांना चिथावणी देणे आणि अन्य आरोपांखाली दोषी ठरवून 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

लष्कराने केलेल्या बंडात स्यू की यांच्या नेतृत्वाखालील सरकार खाली खेचून देशात लष्करी राजवट लागू करण्यात आली होती. लष्कराने केलेल्या या बंडाविरोधात देशभर मोठे आंदोलन झाले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या बंडाचा मोठा निषेध जाला होता. 

म्यनमारमध्ये रुजू पहात असलेली लोकशाही उखडून टाकून पुन्हा एकदा लष्करी हुकुमशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या बंडाने केला असल्याची टीका सर्वच स्तरांमधून झाली होती. लोकशाहीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या स्यू की यांना 15 वर्षे तुरुंगवास भोगायला लागला होता. त्यांनी केलेल्या संघर्षाबद्दल त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मात्र लष्करी राजवटीने स्यू की यांना शिक्षा सुनावल्यानंतर लष्करी बंडावरील टीका पुन्हा एकदा व्हायला लागली आहे.

म्यानमारमधील निवडणुकीत स्यू की यांच्या पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर लष्कराने त्याना सत्ता स्थापन करू दिली नव्हती. त्यापूर्वीच लष्कराने बंड केले होते. स्यू की यांना 1 फेब्रुवारी रोजी अटक झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. या शृंखलेतील पहिल्या प्रकरणाचा निकाल आज दिला गेला. जर स्यू की यांना सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवले गेले तर स्यू की किमान 100 वर्षांची शिक्षा होऊ शकते.

सध्या स्यू की या अज्ञात ठिकाणी आहेत. त्यांना एखाद्या तुरुंगात हलवण्यात येईल का स्थानबद्धतेतच ठेवण्यात येईल, हे आज न्यायालयाने स्पष्ट केले नाही. स्यू की गेल्या 10 महिन्यांपासून स्थानबद्धतेत आहेत. त्यामुळे त्यांच्या शिक्षेतील तेवढा कालावधी कमी करण्यात आला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.