‘नोंद नाही; नुकसान भरपाई नाही’ सांगणाऱ्या केंद्र सरकारवर सुप्रिया सुळे संतापल्या

मुंबई – करोनाच्या लॉकडाऊनच्या काळात लाखो स्थलांतरित मजूर मोठ्या हालअपेष्टा सहन करीत आपल्या गावी पोहोचले. त्या मधल्या प्रवासात अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला. तथापि, त्या काळात नेमक्‍या किती स्थलांतरितांचे निधन झाले याची आकडेवारी किंवा नोंद सरकारकडे नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई देता येणार नाही, असे निवेदन काल सरकारतर्फे संसदेत देण्यात आले. सरकारच्या या निवेदनावर आता चौफेर टीका करण्यात येत आहे. 

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारला खडे बोल सुनावले आहेत. 

आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर सुळे लिहतात, “केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने स्थलांतरीत मजूरांची नोंद आपल्याकडे नाही त्यामुळे त्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे कळविले आहे.ही अतिशय संतापजनक बाब असून ही असंवेदनशीलता कोणत्याही व्यक्तीला चीड आणणारी आहे.”

“सुरुवातीला कोरोनाचं गांभीर्य न ओळखून नंतर मात्र कसलंही नियोजन न करता अतिशय घाईघाईने केंद्र सरकारने लॉकडाऊन केलं. अनेक गरीब मजूरांना उपाशीपोटी, हजारो किलोमीटर रस्त्याने पायी चालत जायला भाग पाडलं.अनेकांनी रस्त्यातच प्राण सोडले.”

“गोरगरीबांचे हे हाल केंद्र सरकारच्या लक्षात आले नाहीत का? रेल्वे रुळावर हातात भाकरी घेऊन झोपेतच कटलेल्या मजूरांचे मृतदेह केंद्र सरकारला दिसले नाहीत का? वडिलांच्या खांद्यावर भुकेने व्याकूळ होऊन मरण पावलेल्या लेकरांचा टाहो ऐकायला आला नाही का? ही असंवेदनशीलता भयावह आहे.” असे प्रश्नही सुळे यांनी उपस्थित केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.