नवी दिल्ली – राजस्थानातील कॉंग्रेस सरकारच्या विरोधात बंड पुकारणारे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे आज संध्याकाळपर्यंत तरी दिल्लीतच होते. त्यांच्यासाठी पक्षाची दारे उघडी आहेत, असे कॉंग्रेस तर्फे आवाहन करण्यात आले असले तरी त्याला पायलट यांनी अजूनपर्यंत तरी धूप घातलेली नाही.
आपली राहुल गांधी यांना भेटण्याची कोणतीही योजना नाही, असे त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, पुढील राजकीय भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली नाही. आपण भाजपमध्ये जाणार नाही असे त्यांनी या आधीच स्पष्ट केले आहे. जयपूरमध्ये आज कॉंग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यासाठी व्हीपही बजावण्यात आला होता.
या बैठकीचे निमंत्रण पायलट यांनाही देण्यात आले होते, पण ते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे पक्षाचे व्हीप धुडकावला म्हणूनही त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, पण त्याला त्यांनी भीक घातली नाही. मात्र, ते दिल्लीत नेमके कोणाशी सल्लामसलत करीत आहेत हे मात्र अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही.