गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केली मोदींशी चर्चा

गुगल येत्या 5-7 वर्षात भारतात 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली – गुगल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगवरून चर्चा केली. त्यानंतर गुगल फॉर इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमात बोलताना पिचाई यांनी गुगल तर्फे भारतात येत्या 5 ते 7 वर्षात 75 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याची घोषणा केली.

भारतात डिजीटल इकॉनॉमी वेगाने प्रसार पावत आहे. त्यामुळे कंपनीला भारताच्या भवितव्या विषयी मोठा विश्‍वास वाटत असून त्यामुळेच आम्ही भारतात 75 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करायचे ठरवले आहे असे त्यांनी नमूद केले.ते म्हणाले की नवीन तंत्रज्ञानाची पहिली पिढी भारतात तयार होत आहे. तंत्रज्ञान आपल्या पर्यंत पोहोचण्याची ही पिढी वाट पहात बसत नाही.

आज भारतापुढे आणि जगापुढे आरोग्य आणि आर्थिक क्षेत्रातील गंभीर प्रश्‍न उभे राहिले आहेत. त्यामुळे आता आपल्याला यापुढे कसे काम करायचे आणि कसे जगायचे याचा फेरविचार करावा लागेल. या आव्हानात्मक काळातच नाविन्याला चालना मिळत असते असे ते म्हणाले. या नाविन्याचा आणि नवीन तंत्रज्ञानाचा भारताला लाभ होईलच तथापि भारत यात नेतृत्वही करू शकेल असेही पिचाई यांनी नमूद केले.

भारतात केल्या जाणाऱ्या गंतवणुकीविषयी बोलताना ते म्हणाले की, आमची ही गुंतवणूक डिजीटायझेशन कार्यक्रमाच्या चार महत्वाच्या भागाशी संबंधीत असेल. त्यात प्रत्येक भारतीयाला त्याच्या स्वताच्या भाषेतून माहिती मिळाली पाहिजे यासाठी आम्ही प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणार आहोत.

भारताच्या गरजेनुसार आम्ही सेवा क्षेत्रातील नवीन उत्पादनेही भारतात उपलब्ध करून देणार आहोत. सामाजिक कल्याणासाठी आर्टिफिशीयल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा कसा वापर करून घेता येईल याचाही विचार आम्ही करीत आहोत असे त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.