Mla Ganpat Gaikwad: उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्येच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले, “संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. रात्री उशिरा याबाबत माहिती मिळाली असून कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात. संबंधित घटनेबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणार आहे.”
भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
दरम्यान, या घटनेत महेश गायकवाड यांना सहा गोळ्या आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने माध्यमांना दिली. दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने सध्या कल्याण-उल्हासनगर शहरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षभरापासून दोन्ही गायकवाड गटात कल्याण पूर्वेतील विधानसभेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. त्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.