सातारा – जागतिक हवामान बदल, दुष्काळ, अतिवृष्टी, कोव्हिड-19 ही सर्व मानवनिर्मित संकटे आहेत. ती नको असतील तर वृक्षारोपण व त्यांचे संगोपन करून पर्यावरण रक्षण हा एकमेव पर्याय आहे. “हरित सातारात करण्याच्या उद्देशाने वन विभागाच्या सहकार्याने “ड्रोंगो’ पर्यावरण संरक्षण व संवर्धन ही संस्था प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या इच्छेनुसार मोफत रोपे देणार आहे. इच्छुकांनी आपली मागणी आगाऊ नोंदवावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे यांनी केले आहे.
या उपक्रमात सातारा परिसरातील वृक्षप्रेमींना काही रोपे मोफत देण्यात येणार आहेत.
ही सर्व रोपे देशी व स्थानिक प्रजातीची आहेत. ज्यांच्याकडे रोप लावण्यासाठी स्वत:ची अथवा सुरक्षित जागा आहे, अशांना चांगली वाढ झालेली रोपे मोफत मिळतील. या उपक्रमात वाटप करण्यात आलेल्या रोपांचे संगोपन होत आहे का, याचा संस्थेकडून वेळोवेळी पाठपुरावा केला जाणार आहे. हा उपक्रम सातारा शहर व लगतच्या उपनगरांसाठी मर्यादित आहे. उपलब्ध होणारी रोपेही मर्यादित असल्याने आपल्या आवडत्या प्रजातीचे रोप संस्थेकडे आधीच नोंदवून ठेवावे.
ही रोपे दि. 18 रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत, वन विभागाच्या गोडोलीतील रोपवाटिकेत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून वाटण्यात येतील. इच्छुकांनी रोप नोंदणीसाठी आपले नाव, पत्ता व कोणत्या प्रजातीची किती रोपे हवीत, ते लेखी कळवावे. एका व्यक्तीस जास्तीत जास्त दहा रोपे मिळू शकतील. ही रोपे जगवण्याची जबाबदारीही संबंधितांची राहील, असे सुकाळे यांनी सांगितले.
उपलब्ध रोपे
शोभिवंत, फुलझाडे : बहावा, पळस, पारिजातक, पिवळा चाफा, कांचन, आपटा, जारूल/ताह्मण, बकुळ
गृहोपयोगी, धार्मिक : बेल, कडुनिंब, उंबर
फळझाडे : फणस, जांभूळ, आवळा, चिंच, पेरू, सीताफळ, रामफळ, कवठ
छाया वृक्ष : वड, पिंपळ, करंज
औषधी व बहुउपयोगी वृक्ष : रिठा, बेहडा, आवळा, करंज, कडुनिंब, मोह, बहावा