सिडनी – करोनाची लस न घेतलेल्यांना नोकरी देऊ नये, असे आदेश फिजीचे पंतप्रधान फ्रॅंक बेनीमारामा यांनी दिले आहेत. हा आदेश कठोर वाटत असला तरी, त्यामागे करोनाचा फैलाव होऊ नये, या भावना असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे करोनाची लस घेतली नाही तर नोकरी गमवावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केल्यामुळे देशात प्रत्येकाला करोनाची लस घेणे अनिवार्य झाले आहे. देशात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यानंतर पंतप्रधान बेनीमारामा यांनी हे आदेश दिले आहेत.
करोना लसीचा पहिला डोस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवले जाणार आहे. तर नोव्हेंबरपर्यंत करोना लसीचा दुसरा डोस न घेतल्यास त्यांना कामावरून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे खासगी कंपन्यांनाही ताकीद देण्यात आली आहे. लसीकरण गंभीरतेने न घेतल्यास मोठा दंड भरावा लागेल असे सांगितले आहे.
खासगी कर्मचाऱ्यांसाठी डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर ज्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल. त्या कंपन्या बंद करण्याचा इशारा देखील दिला आहे. लस नाही तर जॉब नाही, करोनापासून बचावासाठी लस एकमात्र उपाय आहे. या आधारावर आम्ही नवी नियमावली आखली आहे. लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना जॉब गमवावा लागेल, असे बेनीमारामा यांनी सांगितले.
देशाच्या अर्थव्यवस्थेत गेल्या वर्षी करोनामुळे 19 टक्क्यांनी घट झाली होती. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना देशात येण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला होता. फिजीमध्ये अर्ध्याहून अधिक रोजगार हा पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे. फिजी या देशात आतापर्यंत 8 हजार 661 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 48 जणांचा मृत्यू झाला आहे.