न्यूयॉर्क – ज्या लोकांना फायजर आणि मॉडर्नाची लस देण्यात आली आहे, त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता 91 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. अभ्यासानुसार या लसींमुळे लोकांमध्ये करोना लक्षणांची तीव्रता आणि संसर्ग कालावधी कमी होतो. हा अभ्यास 30 जून रोजी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झाला आहे.
फ्रंटलाइन वर्कर्स, डॉक्टर आणि परिचारिका यांच्यातील कोरोना संसर्गाचा धोका व त्याचे प्रमाण किती आहे, हे जाणून घेण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. जे लोक दररोज करोना विषाणूच्या संपर्कात येत आहेत त्यांना फायझर आणि मॉडर्ना या दोन लसींच्या डोसनी या आजारापासून वाचवले.
ज्यांना दुर्दैवाने लसीकरण केल्यानंतर करोना विषाणूची लागण झाली आहे, त्या लोकांची प्रकृती लस न घेतलेल्या करोनाग्रस्तांपेक्षा चांगली आहे, असे या अभ्यासात आढळून आले आहे. लसीच्या दुसऱ्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर लस घेतलेल्या व्यक्तीला करोनाचा संसर्ग होण्याचा धोका 91 टक्क्यांनी कमी झाला आहे.
अभ्यासात असेही आढळले आहे की, लसीच्या पहिल्या डोसच्या दोन आठवड्यांनंतर संसर्गाचा धोका 81 टक्क्यांनी कमी झाला आहे. अभ्यासात 3,975 लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. यापैकी केवळ 204 म्हणजेच पाच टक्के लोकांमध्ये विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले. यापैकी 156 लोकांचे लसीकरण करण्यात आले नव्हते. तसेच 32 लोकांच्या बाबतीत लसीकरणाबाबत अनिश्चित स्थिती होती. 16 लोकांना पूर्णपणे किंवा अंशतः लसीकरण करण्यात आले होते.