तब्बल 14 महिन्यांनंतर केली वसुली
पुणे – दुचाकीचालकाला विनाहेल्मेट वाहन चालवणे चांगलेच महागात पडले आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एका वाहनचालकाकडून तब्बल 12,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बुधवार चौकामध्ये हवालदार मोहन भापकर यांनी ई-चलनच्या माध्यमातून या दंडाची वसुली केली. यातील “नो हेल्मेट’चा दंड तब्बल साडेअकरा हजार रुपये आहे.
फरासखाना वाहतूक शाखेच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. वाहनचालकाच्या नावावर एकूण 27 चलनांची नोंद असून त्यापैकी विनाहेल्मेट वाहन चालविण्याबद्दल 23 चलनांची तर अन्य वाहतूक नियमभंगाबाबत चार चलनांची नोंद असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अतुल थोरात यांनी दिली. दि. 21 मार्च 2018 ते 9 मे 2019 या कालावधीत संबंधित वाहनचालकास दंड ठोठावण्यात आला आहे.
शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या वाहतूक पोलिसांच्या नेमणुकीबरोबरच “सीसीटीव्ही’ या तिसरा डोळ्याची देखील वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर नजर असते. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा पुन्हा उगारला जात आहे. मागील काही कालावधीमध्ये दंड वसूल करण्याचे प्रमाण कमी झाले होते. मागील आठवड्यात देखील वाहतूक पोलिसांना एका चारचाकी वाहनचालकाने वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 24,200 रुपयांचा दंड वसूल केला होता. दुचाकीचालकावर मोठ्या रकमेची करण्यात आलेली सलग दुसरी कारवाई असल्याने वाहतूक पोलिसांचे नियमभंग करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष असल्याचे चित्र दिसत आहे.