प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 -सिंहगड रस्त्यावर महापालिकेकडून उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या मधोमध बॅरीकेडस् लावण्यात आले आहेत. त्यातच, रस्त्याकडेला भाजी विक्रेते तसेच पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने या रस्त्यावर गेल्या दोन महिन्यांपासून प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी हा रस्ता महापालिकेकडून “नो हॉकर्स झोन’ करण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी फिरते पथक नेमण्यात आले असून कारवाईत विक्रेते आढळल्यास थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले.
महापालिकेकडून फनटाइम सिनेमा ते राजारामपूलापर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतरात उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या पूलांच्या खांबाच्या पायाचे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले आहे, यात हा रस्ता उखडला गेला. तर, काम सुरू झाल्याने बॅरीकेडस् लावल्यामुळे हा रस्ता अरूंद झाला आहे. या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी दोन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना एक ते दिड तासांचा वेळ लागतो. या रस्त्यावर स्वागेटकडून धायरीकडे जाण्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला भाजी विक्रेते आणि पथारी व्यावसायिक बसतात. खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात यामुळे, वाहतूक कोंडीत भर पडते. त्यामुळे, ही कोंडी फोडण्यासाठी हा रस्ताच राजारामपूल ते फनटाईम पर्यंत “नो हॉकर्स झोन’ म्हणून निश्चित करण्यात आल्याचे माधव जगताप यांनी स्पष्ट केले.
पोलीस प्रशासन ढीम्म…
महापालिका प्रशासनाकडून या रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी कारवाई करण्यात येत असली तरी वाहतूक पोलिसांकडून मात्र केवळ जादा कर्मचारी नेमण्या व्यतिरीक्त काहीच करण्यात येत नाही. राजारामपूल ते फनटाइमपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्ता अडवून चारकाची वाहने पार्किंग केली जात आहेत. या रस्त्यावरील माणिकबाग चौक, हिंगणे चौक, संतोष हॉल चौकात रस्ता अरूंद असतानाही सहा आसनी रिक्षाचालक प्रवासी घेण्यासाठी चौकातच थांबून प्रवासी येण्याची वाट पाहतात. परिणामी, इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी रस्ता राहत नसल्याने वाहतूक कोंडी होत आहे.