पुणे : राज्यशासनाकडून शहरातील करोनाग्रस्त रूग्णांसाठी उभारण्यात येणाऱ्या जंबो हॉस्पीटलसाठी कोणताही निधी नाकारलेला नसल्याचे स्पष्टीकरण स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी केले आहे. शहरातील रूग्णांसाठी हे हॉस्पीटल उभारले जाणार आहे, तसेच ही महापालिकेची जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
मात्र, त्याचवेळी शहरात गेली 4 महिने महापालिकेकडून सातत्याने करोना नियंत्रणासाठी काम केले जात असून त्यावर आत्तापर्यंत अडीचशें ते तीनशें कोटींचा खर्च झाला आहे. मात्र, शासनाने या साथ नियंत्रणाची सर्व जबाबदारी पालिकेवर सोडली असून आत्तापर्यंत दिलेली मदत अतिशय तुटपूंजी आहे. त्यामुळे शासनाने पालिकेस तातडीनं आर्थिक मदत द्यावी या मागणीचाही त्यांनी पुनरूच्चार केला.
शहरात ऑगस्ट महिन्यात करोनाग्रस्त रूग्णांचा आकडा 2 लाखांच्या वर जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी गंभीर करोनाग्रस्त रूग्णांना खासगी तसेच शासकीय रूग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्याचे उपमुख्यंत्री अजित पवार यांनी शहरासाठी जंबो हॅस्पीटल उभारण्यात येणार असून त्यासाठी राज्यशासन तसेच महापालिका, पीएमआरडीए आणि जिल्हाप्रशासन तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका एकत्रित निधी देतील असे स्पष्ट केले होते.
याबाबत बोलताना रासने यांनी महापालिकेने आधीच शहरातील करोनाग्रस्तांसाठी अडीचशें कोटींचा खर्च केला आहे, तर शासनाने केवळ 3 कोटी मदत म्हणून दिले आहेत. त्यामुळे पालिकेस ही साथ आटोक्यात येईपर्यंत आणखी खर्च करावा लागणार आहे. त्यातच, लॉकडाऊनमुळे महापालिकेचे उत्पन्नही घटलेले आहे. अशा स्थितीत या हॉस्पीटचा खर्च शासनाने उचलावा असे वक्तव्य केले होते. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मोठया प्रमाणात विरोधीपक्षांकडून रासने यांच्यावर टिकेची झोड उठविण्यात आली होती. त्यानंतर रासने यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना याबाबत खुलासा केला आहे.
शहरातील करोना नियंत्रनचा कोणताही खर्च पालिकेने थांबविलेला नाही तसेच थांबवणारही नाही. जंबो हॉस्पीटल हे पुणेकरांसाठीच असल्याने त्यासाठी महापालिका सर्वोत्परी सहकार्य करणार असून आवश्यक निधी स्थायी समितीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती आणि करोना नियंत्रणाचे काम पाहता शासनाने या हॉस्पीटलसाठी खर्च द्यावा एवढीच आपली भूमिका होती असा खुलासा त्यांनी यावेळी केला.
तसेच पालिकेच्या 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात आपण स्वत: शहरासाठी सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यासाठी निधी प्रस्तावित केला असल्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.