पुणे : घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास समर्थ पोलिसांनी अटक केली. लॉकडाउनच्या काळात त्याने भवानी पेठ भागात केलेले दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून 1 लाख 65 हजार रूपयांचा ऐवज जप्त केला. दरम्यान चोरीचा ऐवज लपवून ठेवण्यास मदत केल्याप्रकरणी त्याच्या आई आणि आजीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या आई व आजीने चोरीचे दागिने घरात लपवून ठेवले होते.
अरबाज उर्फ बबन इक्बाल शेख (22 , रा. चुडामन तालीमजवळ,भवानी पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी अमित भोसले याचे बी टी शहानी शाळेशेजारी भवानी पेठ येथे जेनरिक मेडिकल आहे. मेडिकल बंद असताना अज्ञात चोरट्याने दुकानातील बाथरूमची जाळी उचकवटून आत प्रवेश केला तसेच रोख रक्कम, दागिने आदी 1 लाख 65 हजारांचा ऐवज चोरून नेला होता.
याप्रकरणाचा तपास करीत असताना कार्यपध्दतीवरून हा गुन्हा अरबाज याने केला असावा असा संशय समर्थ पोलिसांना आला. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, प्रदिप पालांडे, कर्मचारी राजस शेख,संतोष काळे,प्रमोद टिळेकर,निलेश साबळे, साहिल शेख, सुमित कु ट्टे आदींच्या पथकाने अरबाज याला ताब्यात घेतले तपासात त्याने गुन्ह्याची कबूली दिली तसेच गुन्ह्यातील माल घरात लपवून ठेवल्याचे सांगितले.
पोलिसांनी घरी जावून तपास केला असता मुलास वाचविण्यासाठी आरोपीच्या आईने चोरीचा माल त्याच्या आजीच्या घरात लपवून ठेवला होता. दोघींकडे कसून चौकशी करताच त्यांनी ऐवज पोलिसांना काढून दिला. पोलिसांनी अरबाज याच्याकडून बी.टी. शहाणे शाळेजवळ केलेला घरफोडीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आणला आहे.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त संजय शिंदे, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त मिलींद पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनानूसार पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर कापूरे व प्रदीप पलांडे, पो. शि.अनिल शिंदे, गणेश कोळी, स्वप्निल वाघुले, सचिन पवार, चंद्रशेखर खरात, महिला कर्मचारी सोनल माकर-म्हस्कुले, राजश्री खैरे, सुरेखा शिंदे, स्मिता सिताप यांच्या पथकाने केली.